आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुली मारून मद्याच्या बाटलीची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बनावट दारू विक्रीच्या घटना वाढत असल्याने दुकानात विकल्या जाणार्‍या देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांवर परमनंट मार्करने क्रॉस करूनच बाटल्यांची विक्री करण्याचा फतवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढला आहे.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये बनावट दारूचा साठा पकडण्यात आल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहे. वॉइन शॉप व दारूच्या दुकानातून विकलेल्या बाटल्या खाली झाल्यानंतर त्या बाटल्यांमध्ये बनावट दारू बनवून विक्रीचे प्रकार उत्पादन शुल्क विभागास आढळून आले होते. याची दक्षता घेत विभागाने दारू विक्रेत्यांना या सूचना दिल्या आहेत. शहरातही उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडून मद्य विक्रेत्यांकडे यासंबंधीचे लेखी, तोंडी आदेश देणे सुरू आहेत. हॉटेल चालकांना माहिती देऊन बाटल्यांवर क्रॉस करूनच विक्री करण्याचे सक्त निर्देश दिले जात आहेत. ते टाळणार्‍या हॉटेल चालकांना आर्थिक दंड ही आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी बहुतांश हॉटेलांमध्ये बाटलीच्या विक्रीपूर्वीच त्यावर क्रॉसची फुली मारून ती ठेवली जात आहे.

बुच पुन्हा सील करून विक्री
हॉटेलमध्ये मोठय़ा संख्येने खाली होणार्‍या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या व्यावसायिक भंगार बाजारात विकतात. तेथून त्या पुन्हा संबंधित कंपनीकडे जाणे अपेक्षित असताना, लेबल असलेल्या बाटल्या अन्यत्र विकल्या जातात. त्याच बाटल्या पुन्हा बनावट मद्य भरून बुच सील करून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदाही उत्पादन शुल्क विभागास आढळून आला होता. या विषयी मद्य बनवणार्‍या कंपन्यांकडूनही ओरड वाढली होती. यावर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अन्य जिल्ह्यांमध्ये बनावट दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात मात्र अद्याप तसे आढळून आलेले नाही. मात्र, वरिष्ठ कार्यालयाने यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. खाली बाटल्यांचा वापर करून बनावट दारू त्याच नावाने विकली जाऊ नये, यासाठी दक्षता म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे. ना.ना.पाटील, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

उत्पादन शुल्क विभागाकडून बाटल्यांवर क्रॉस करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र, मोठय़ा प्रमाणात ते करावे लागत असल्याने त्रास वाढला आहे. ग्राहकांकडून वारंवार याची विचारणा होते त्यामुळे त्यांचे समाधान करावे लागते. सूचना रास्त आहे; मात्र ग्राहकांचा समजही दूर करावा लागतो. रवींद्र भोळे, व्यवस्थापक, हॉटेल सुयोग