आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट दारूविक्रीचा भंडाफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रिकाम्या बाटल्यांमध्ये दारू भरून त्या नवीन भासवून ग्रामीण भागात व ढाब्यांवर विक्री करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी रात्री एरंडोल तालुक्यातील उत्राण गावाजवळ नामांकित कंपन्यांचे लेबल लावलेला बनावट दारूचा 33 हजार 600 रुपयांचा माल पकडला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बनावट दारू जिल्ह्यात आल्याची शक्यता लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी सुरू होती. याबाबत निरीक्षक पी.एन.पाटील यांना शनिवारी गुप्त माहितीदाराकडून कळले की, कासोदा-उत्राण गावांदरम्यान बनावट दारूची विक्री होत आहे. त्यामुळे उपअधीक्षक एन.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.एन.पाटील, दुय्यम निरीक्षक किशोर पाटील, कॉन्स्टेबल आर.टी.सोनवणे, पी.पी.वाघ, एम.आर.वाघ व नरेंद्र पाटील यांच्या पथकाने कासोदा परिसरात शोध सुरू केला. यादरम्यान रात्री 9.30 वाजेच्या सुमारास उत्राण गावाच्या काही अंतरावर महिंद्रा कंपनीची झायलो (क्र.एमएच-15/सीटी-183) ही गाडी पथकाच्या नजरेस पडली. पथकाने तपासणी केली असता त्या वाहनात बॅगपायपर, ऑफिसर चॉइस, इम्पेरियल ब्ल्यू व मॅकडॉवेल या कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या भरलेले 7 बॉक्स आढळून आले. सुमारे 33 हजार 600 रुपयांचा हा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नारायण पाटील (रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, ह.मु.नाशिक) व दिनकर पाटील (रा.आसनखेडा, ता.पाचोरा, ह.मु.सिडको, नाशिक) यांनाही ताब्यात घेतले.
जुन्या बाटल्यांचा वापर
ग्रामीण भागात दारूविक्रेत्यांकडून व ढाब्यांवर मोठय़ा प्रमाणात दारूविक्री होत असल्याने या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यात बनावट दारू भरली जाते. तसेच झाकणाला प्लास्टिकचे आवरण लावून ती खरी दाखवली जाते.
आरोपींची आज हजेरी
आरोपींना एरंडोल न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गाडीसह 4 लाख 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.