आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ई-चलना’मुळे आता व्यवहार नोंदणी होणार कॅशलेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासनाला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणार्‍या मुद्रांक व नोंदणी विभागाने नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्काचे पैसे कॅशऐवजी चलनाद्वारे स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ‘ई-चलन’ची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारंवार उद्भवणार्‍या स्टॅम्पपेपरच्या तुटवड्यावर स्टॅम्पपेपरसारखाच ‘ईएसबीटीआर’ हा नवा पर्याय देण्यात आला असून, आयडीबीआय बॅँकेत ही सुविधा
उपलब्ध आहे.
‘आय-सरिता’ या प्रणालीद्वारे राज्यभरातील व्यवहारांची नोंदणी ऑनलाइन करण्यात यशस्वी ठरलेल्या मुद्रांक व नोंदणी विभागातर्फे प्रणालीत लोकाभिमुख बदल केले जात आहेत. व्यवहारांची प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे कोणत्याही व्यवहाराची माहिती कोठेही सहज पाहता येते. या प्रक्रियेमुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होत आहे. तथापि, नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोंदणी कार्यालयात रोखीने पैसे भरावे लागत होते; मात्र नवीन निर्णयानुसार शासकीय तिजोरीत भरले जाणारे पैसे आता थेट बॅँकेत भरावे लागणार असून, 1 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
स्टॅम्पपेपरला पर्याय
वारंवार उद्भवणार्‍या स्टॅम्पपेपरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांचे अनेक व्यवहार खोळंबत होते. तसेच स्टॅम्पपेपरऐवजी फ्रॅँकिंग करण्यास ग्राहक धजावत नसल्याने वेळही वाया जात होता. त्यावर पर्याय असलेली; परंतु स्टॅम्पपेपरसारखीच ‘ईएसबीटीआर’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आयडीबीआय बॅँकेत पैसे भरून ग्राहक स्टॅम्पपेपरऐवजी ‘ईएसबीटीआर’ घेऊ शकतात. त्यातही ऑनलाइन आणि मॅन्युअल असे दोन पर्याय आहेत. या सुविधेमुळे स्टॅम्पपेपरच्या तुटवड्याचा व्यवहारांवर परिणाम होणार नाही.
मालमत्ता मूल्यांकन दरवाढीचा प्रस्ताव
नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे दरवर्षी 1 जानेवारीला मालमत्तांचे शासकीय मूल्यांकन जाहीर केले जाते. तथापि, या वर्षी जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विभागातील मालमत्तांसह शेतीच्या मूल्यांकनात 10 ते 30 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हा नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे शासनाला पाठवण्यात आला आहे. सन 2012च्या तुलनेत 2013मध्ये जिल्ह्यात व्यवहारांची संख्या 10 टक्क्यांनी घसरली आहे; मात्र दुष्काळी स्थिती असूनही मागील वर्षात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले होते. शहरातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कार्यालय क्रमांक एकमध्ये 2012 या वर्षात 8,064 व्यवहारांची नोंदणी झाली होती; मात्र 2013मध्ये आतापर्यंत केवळ 5,847 व्यवहारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावानुसार शहरी भाग, शहराला लागून असलेला भाग आणि ग्रामीण भाग अशा तीन प्रकारात मूल्यांकन ठरवले जाणार असून, 1 जानेवारी रोजी नवे दर जाहीर होणार आहेत.
‘ई-चलना’मुळे ऑनलाइन पेमेंट
ग्राहक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ‘ई-चलन’द्वारे बॅँकेशिवाय नोंदणी करू वा मुद्रांक शुल्क भरू शकतात. या पद्धतीमुळे स्टॅम्पपेपरची गरज उरलेली नाही. तसेच ऑनलाइन पेमेंट केल्याची पावती कागदपत्रांना जोडून ग्राहक वेळेची बचत करू शकतात. याच आठवड्यात ही सेवाही सुरू झालेली आहे.