आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घरबसल्या जळगावातून किराणा खरेदीची मिळेल सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- थेट विदेशी गुंतवणुकीच्या वृत्ताने महानगरांमधले अनेक सुपरशॉपी मालक धास्तावलेले असताना जळगावसारख्या शहरात राहून गुणवत्ता आणि आधुनिक सेवेच्या बळावर पारंपरिक व्यवसायाला नवजीवन देणार्‍या कांकरिया बंधूंनी आता पुढचे पाऊल टाकले आहे. स्थानिक ग्राहकांसह बाहेर गावच्या ग्राहकांनाही किराणा माल खरेदी करता यावा म्हणून ‘ई-परचेसिंग’ची सुविधा नवजीवन सुपर शॉपीच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर आाणि संकेतस्थळ (वेबसाइट ) निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असून फेब्रुवारी अखेर ग्राहकांना घरबसल्या किराणा आणि अन्य वस्तू खरेदी करता येणार आहेत.

सुमारे 70 वर्षांपासून किराणा व्यवसायात असलेल्या कांकरिया परिवाराने वेळोवेळी ग्राहक सेवेत सकारात्मक बदल केले आहेत. त्यातूनच 48 वर्षांपूर्वी त्यांनी ‘नवजीवन’ नावाने सुपर शॉप सुरू केले. आज नवीपेठ, बहिणाबाई उद्यान, नवीन बसस्थानक, महाबळ अशा चार ठिकाणी त्याची साख्रळी तयार झाली आहे. कांतीलाल, सुनील व अनिल हे तिघे कांकरिया बंधू याचा कारभार पाहत असून आज तिसर्‍या पिढीतील सदस्यांसह कुटूंबातील 7 सदस्य हा सर्व कारभार सांभाळतात.

डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुरुवात
20 वर्षांपूर्वी डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याची सुविधा आस्थापनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. वर्षभरात केवळ एकच ग्राहकाने त्या वेळी खरेदी केली होती. तीन वर्षांपूर्वी ‘नवजीवन’च्या सर्व शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने एकूण ग्राहकांपैकी केवळ दीड टक्के ग्राहक कार्ड स्वीप करून खरेदी करतात. हे प्रमाण सध्या 12.5 टक्के झाले आहे. इंटरनेटचा वाढता वापर व ग्राहक मानसिकतेचा अभ्यास केल्यावर दोन-तीन वर्षांत ऑनलाइन खरेदीलाच मोठय़ा प्रमाणात पसंती दिली जाईल, हे ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे घरी बसून ग्राहक वस्तूंची यादी नोंदवू शकतील आणि घरपोच सेवेच्या माध्यमातून त्यांच्या घरी किराणा पोहोचवला जाईल. ज्यांच्याकडे क्रेडीट अथवा डेबिट कार्ड नसेल ते घरी किराणा पोहोचल्यावरही पैसे रोखीने अदा करू शकतील.

अशी आहेत ई-परचेसिंगची वैशिष्टे
शॉपीत उपलब्ध असलेल्या सामानाची वर्गवारीनुसार यादी, वस्तूंचे दर, त्यावरील ऑफर या संदर्भातील संपूर्ण माहिती ग्राहकाला नोंदणीच्या वेळी पाहता येईल. वस्तूंची निवड करतानाच एकूण रक्कम किती होईल, याचा तपशील दिसेल. ई-पेमेंट करता येईल आणि ग्राहकांच्या काही सूचना असल्यास ग्राहकाला त्या नोंदवता येणार आहेत.

काळानुरुप बदल गरजेचे
कुठल्याही कुटुंबाच्या महिनाभराच्या किराणा सामानात किमान 110 प्रकारच्या वस्तू लागतात. काळानुरुप सेवेत बदल करण्याच्या दृष्टीने अभ्यास केल्यावर ऑनलाइन नोंदणी करून घरपोच डिलेव्हरी देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील ग्राहक सुविधा म्हणून आम्ही याकडे पाहतो आहे. ग्राहकांच्या सूचनांनंतर आवश्यकता वाटल्यास यात आणखी सुविधा वाढवता येतील. अनिल कांकरिया, संचालक, नवजीवन सुपर शॉपी