आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानमोडीची अफवा; अनेकांची झोपमोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री मानमोडीची साथ (प्लेग) आणि भूकंप झाल्याची अफवा पसरविण्यात आली. भीतीपोटी नागरिकांनी रस्त्यावर बसून रात्र जागून काढली; हेतुपुरस्सर ही अफवा पसरविण्यात आल्याचे उघड झाले. यापूर्वी जळगाव जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी असा प्रकार घडला होता. शहरात दिवसभर याच प्रकाराची चर्चा सुरू होती.

शहरातील जुने धुळे भागातील काही नागरिकांना लामकानी परिसरातून दूरध्वनीवरून मानमोडीची साथ आल्याने कोणीही रात्री झोपू नये, असा निरोप आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळींना दूरध्वनी लावून या प्रकाराची खात्री करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम वेगळाच झाला. शहरातील चितोड रोड, शिवाजीनगर आणि झोपडपट्टी भागात मानमोडीची साथ आल्याची अफवा पसरली. मानमोडीच्या आजारात व्यक्ती झोपल्यास त्याचा झोपेतच मृत्यू होतो, असेही सांगण्यात येत होते. त्यात भरीस भर म्हणजे औरंगाबाद येथून काहींनी धुळे शहरातील मुस्लिमबहुल वसाहतीत भूकंप झाल्याचे सांगितले. त्यामुळे या भागात वेगळीच स्थिती निर्माण झाली. अनेकांनी भूकंपाच्या तर काहींनी मानमोडीच्या भीतीपोटी घरात थांबण्याऐवजी रस्त्यावर, मोकळ्या जागेत आणि सुरक्षित स्थळी थांबून रात्र जागून काढली.
मानमोडी नाहीच - देशात सन 1940मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यानंतर असे काहीही झालेले नाही. गेल्या आठ दिवसांत जिल्हा अथवा खासगी रुग्णालयात प्लेगचे रुग्ण दाखल झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी मानमोडीसारख्या आजाराला घाबरू नये, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. प्लेगची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यावर योग्य उपचार झाल्यास हा रोग बरा होतो. डॉ. सुभाष भामरे, कॅन्सरतज्ज्ञ
विश्वास ठेवू नका - मानमोडी, भूकंपाच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामागे कोणाचा काय हेतू आहे हे सांगता येत नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, समाजातील वातावरण खराब होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. प्रा. शरद पाटील, आमदार, धुळे ग्रामीण