आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ तिकिटासाठी सुलभ नियम, रेल्वेचा नवीन नियम सप्टेंबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वेच्या तत्काळ तिकिटांसाठी ओळखपत्राच्या झेरॉक्सच्या नियमात रेल्वे मंत्रालयाने बदल करण्याचा निर्णय घेतला असून, सप्टेंबरपासून या नवीन नियमांची देशभरात अंमलबजावणी होणार आहे. यानुसार, प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी फोटो ओळखपत्राची झेरॉक्स देण्याची गरज नाही. तसेच, प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसाने फोटो ओळखपत्राची मागणी केल्यास रेल्वेने जाहीर केलेल्या १० फोटो ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवले तरी ते ग्राह्य धरले जाणार आहे. यापूर्वी तिकीट काढताना ज्या ओळखपत्राची झेरॉक्स दिली आहे, तेच ओळखपत्र तपासणीसाला दाखवावे लागत होते. तसे नसल्यास फुकट प्रवास म्हणून भाडे दंड भरावा लागत होता.
तत्काळ तिकीट सेवेच्या नियम बदलण्यात आला असून, त्यानुसार रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांना याआधीच्या कठोर नियमामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन रेल्वेने त्यात बदल केला आहे. नवीन नियमामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी पुन्हा दलालांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य गरजवंतांना तत्काळ तिकीट सेवेचा लाभ मिळावा, यासाठी फोटो ओळखपत्राचा नियम लागू केल्याने दलालांच्या संख्येत घट झाली होती. तत्काळ तिकिटासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांचे ओळखपत्र बघून प्रवासी आहे की दलाल, हे ओळखून त्याला बाहेर काढणे रेल्वे अधिकाऱ्यांना शक्य होत होते. परंतु नवीन नियमामुळे दलालांचा पुन्हा सुळसुळाट वाढणार असल्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
गरजवंतांची परवड
तत्काळ तिकिटासाठी दलालांकडून रात्रीपासूनच त्यांची माणसे रांगेत उभी केली जात होती; ते सकाळी खिडकी उघडल्यानंतर तिकिटे काढून घेत असल्याने ओळखपत्राचा नियम लागू केला होता. त्यात बदल केल्याने दलालांना पुन्हा सुगीचे दिवस येतील.
बातम्या आणखी आहेत...