आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवासाठी पाच संस्थांनी घेतला पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरात यंदाचा गणेशोत्सव इकोफ्रेंडली करण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यात चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी (वरणगाव), उपज, वरद विनायक ग्रुप, ग्रीनअर्थ फाउंडेशन, स्वधर्म प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश आहे.

गणेश मंडळांनी शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करावी, थर्माकोल, प्लास्टिक, पीओपीचा वापर टाळावा, असे आवाहन या संस्थांतर्फे केले जात आहे. वरद विनायक ग्रुपने गेल्या आठवड्यात जनजागृतीसाठी पर्यावरण अभ्यासक विद्याधर वालावलकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शहरात 277 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. बहुतांश मंडळांच्या मूर्तींची उंची ही 10 ते 15 फुटापर्यंत असते. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या या मूर्ती विसर्जनानंतरही दोन ते अडीच महिने नदीपात्रात तशाच पडून राहतात. विघटन होण्यासाठी किमान 100 दिवसांचा कालावधी लागतो. विघटनानंतर पीओपीच्या कणांमुळे नदीपात्रातील सिंचनाच्या सछीद्रात अडकून नदीच्या खनन, वहन आणि संचयन कार्यात बाधा येते. त्यामुळे गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन या संस्थांकडून केले जात आहे.

निर्माल्य संकलन
गणेश विसर्जनानंतर निर्माल्य नदीपात्रात टाकले जाते. परिणामी जलस्त्रोत प्रदूषित होतात. उपज व ग्रीन अर्थ फाउंडेशन यंदाही निर्माल्य संकलन उपक्रम राबवणार आहे. निर्माल्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. सुरेंद्र चौधरी, सचिव, उपज संस्था

जनजागृतीवर भर
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वरद विनायक ग्रुपतर्फे शाळा, महाविद्यालयांत जनजागृती केली जात आहे. निसर्गाचेही आपण काही देणं लागतो, या भावनेने प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. स्वप्नील चौधरी, अध्यक्ष, वरद विनायक ग्रुप, भुसावळ

निसर्गाशी बांधिलकी
निसर्गाशी बांधिलकी कायम ठेवण्यासाठी मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. नैसर्गिक संपदा प्रदूषित होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. पीओपीच्या मूर्तींचे विघटन लवकर होत नाही, हे विसरू नये. अनिल महाजन, अध्यक्ष, चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी, वरणगाव

मातीच्या मूर्ती
नदीपात्रात गेल्या वर्षी पीओपीच्या गणेश मूर्तींचे विघटन झालेले नव्हते. स्वधर्म प्रतिष्ठानने या मूर्तींचे अवशेष वाहत्या पाण्यात सोडले होते. गणेशभक्तांनी शाडू मातीच्या लहान मूर्तींवर भर द्यावा. मंदार जोशी, संस्थापक अध्यक्ष, स्वधर्म प्रतिष्ठान, भुसावळ