आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाडू मातीच्या 500 गणेशमूर्तींची झाली आगाऊ नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाप्पाचे आगमन समीप आल्याने सर्वत्र तयारीला वेग आला आहे. पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास लक्षात घेऊन गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशभक्तांचा इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी शाडू मातीच्या जवळपास 500 मूर्तींची आगाऊ नोंदणी विक्रेत्यांकडे झाली आहे.

‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन यंदा प्रत्येक घरात व चौकाचौकात शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन केले असून, त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. तसेच पाणी दूषित होऊन मूर्तीही पूर्णपणे पाण्यात विरघळत नाही. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांतील जलपातळीदेखील जेमतेम आहे. त्यामुळे पीओपीच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने गतवर्षी केलेल्या आवाहनानुसार शहरातील काही मंडळांनी मोठ्या मूर्ती विसर्जित न करता वर्षभर सांभाळून ठेवल्या होत्या. तसेच दोन वर्षांपासून पीओपीच्या मूर्ती टाळून शाडू आणि साध्या मातीच्या मूर्तींवर भर देण्याविषयी विविध संस्था व संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शाडू मातीच्या मूर्ती घेणार्‍या भक्तांची संख्यादेखील वाढली आहे. गतवर्षी ऐनवेळी शाडू मातीच्या मूर्तींना मागणी वाढली; परंतु शहरात तेवढ्या प्रमाणात मूर्ती शिल्लक नव्हत्या. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा विक्रेत्यांनी अगोदरपासून याबाबत नियोजन करून ठेवले आहे.

पाच हजार मूर्तींची होते विक्री
शहरात साधारणत: पाच विक्रेते शाडू मातीच्या मूर्ती आणून, तर काही विके्रते स्वत: मूर्ती तयार करून विकतात. दरवर्षी या विक्रेत्यांकडे काही दिवसआधीच बुकिंग केली जाते. त्यानुसार यंदा सध्या 500 मूर्तींची बुकिंग करण्यात आली आहे. साधारणत: तीन ते पाच हजार मूर्तींची विक्री दरवर्षी होते. मात्र, यंदा त्यात मागणीनुसार वाढ केली आहे. मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम स्थानिक मूर्तिकारांकडून सुरू आहे.

20 टक्क्यांनी मूर्ती महागल्या
शाडू मातीची किंमत महागल्यामुळे यंदा तब्बल 20 टक्क्यांनी गणेशमूर्तींच्या किमती महागल्या असून, त्याचा फटका गणेशभक्तांना बसणार आहे. सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या किमती वाढल्या असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे 150 रुपयांच्या पुढेच शाडूूच्या मूर्तींच्या किमती आहेत. त्याचप्रमाणे भक्तांचा नैसर्गिक साहित्यावरही भर असेल.

येथे करा मूर्तींसाठी नोंदणी
शहरातील मूर्तिकार पंकज दशपुत्रे यांचा गत 80 वर्षांपासूनचा केवळ शाडू मातीच्या मूर्तींचा व्यवसाय आजही अखंडपणे सुरू आहे. 6 इंचांपासून ते 2 फुटांपर्यंतच्या 550 मूर्ती त्यांच्याकडे तयार आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा या मूर्तींना मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. बळीरामपेठेतील मंदिरासमोर या मूर्ती उपलब्ध असून, जून महिन्यापासूनच येथे नोंदणी सुरू आहे. संपर्क : 9423974703

मूर्तीविक्रेते दीपक घाणेकर यांच्याकडेही शाडू मातीच्या 1500 मूर्ती उपलब्ध आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी मातीच्या मूर्तीविक्रीत उच्चांक गाठला आहे. पेण येथून मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती आणल्या जात आहेत.
संपर्क : 2225570, 9423187480

मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण
शाळांमध्येही विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानुसार मुले आपण तयार केलेल्या मूर्ती घरी बसवण्याचा आग्रह पालकांकडे करीत आहेत. यातून विद्यार्थ्यांना ही कला अवगत होण्यासोबतच मातीच्या मूर्तींवर भर देण्याचा उपक्रम शाळांमध्ये राबवला जात आहे.

250 मूर्ती झाल्या बुक
४गेल्या वर्षापेक्षा यंदा शाडूच्या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 250हून अधिक मूर्तींची बुकिंग झाली असून, गेल्या वेळचा प्रतिसाद पाहून यंदा जादा मूर्तींची मागणी केली आहे.
दीपक घाणेकर, विक्रेते