आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयात फक्त परीक्षा; शिक्षण मात्र खासगी वर्गात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावीनंतर चांगले करिअर घडवायचे असेल तर अमूक क्लासेस उत्तम, अमूक शिक्षकच तज्ज्ञ असल्याच्या जाहिराती करून विद्यार्थी पालकांना भुरळ घातली जाते. हे लोण एवढे पसरले आहे की, आता अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावी बारावीच्या वर्गात मुलेच दिसून येत नाहीत. महाविद्यालयात केवळ प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी येतात. त्यानंतर त्यांचा ‘वर्ग’ भरतो तो थेट खासगी शिकवणीमध्ये. काही महाविद्यालयांच्या शिक्षकांनी बेकायदेशीरपणे वर्गात शिकवता घरीच शिकवणी घेऊन ‘अर्थप्राप्ती’ करण्याकडे लक्ष दिलेले दिसून येत आहे.

खासगी शिकवणी घेणा-या शिक्षकांवर त्यांच्या शुल्कांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे शिकवणी घेण्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे या सर्व गोष्टींमुळे पालकांच्या खिशावर चांगलाच ताण पडतो आहे. शिकवणीशिवाय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत भर पडणार नाही. पुढील शिक्षणावर त्याचा परिणाम होईल या प्रकारचा अपप्रचार पद्धतशीरपणे पेरला जातो. परिणामी ८० टक्के पालक विद्यार्थी शिकवणी लावण्यावर भर देतात. त्यामुळे आता महाविद्यालयांपेक्षा जास्त गर्दी खासगी शिकवण्यांमध्ये होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नर्सरीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यांची गरज भासू लागली आहे. ही गरज खरी की नुसताच भ्रम आहे? या संदर्भातही पालक विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची वेळ आली आहे. यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला पाहिजे. दहावीनंतरच्या वर्गांसाठी जळगाव शहरात १० ते १५ मोठे तर १५० पेक्षा घरगुती शिकवण्या आहेत.

विद्यार्थी घाबरतात
काही ठिकाणी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिकवले जात नाही. त्यांना महाविद्यालयाच्या शिक्षकांकडेच शिकवणी लावावी लागते, असा अघोषित नियम आहे. हा नियम मोडणा-या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण देताना संबंधित शिक्षकांकडून अडचणी निर्माण केल्या जातात. या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरतात. परिणामी ‘गुरुजींची शिकवणी’ जोरात चालते.

तपासणी करू
खासगी शिकवणी चालकांची तपासणी करण्यात येईल. कोणत्याही महाविद्यालयाचे शिक्षक घरी शिकवणी घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित शिक्षकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

नियमित तासिकांवर भर
खासगी शिकवणींचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका झाल्या पाहिजे. आमच्या महाविद्यालयात याच गोष्टीवर भर देण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांची गरज भासणार नाही. डॉ.उदय कुळकर्णी, प्राचार्य,मू.जे. महाविद्यालय

शिकवणी शुल्कावर नियंत्रण हवे
भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, गणित या विषयांच्या शिकवणीसाठी वर्षाकाठी १५ ते २० हजार रुपये खर्च करावे लागतात. काही विद्यार्थी दोन, तर काही तीन विषयांची शिकवणी लावतात. यासाठी वर्षाकाठी ५० हजार रुपये खर्च होतात. क्लासेसचे शुल्क ठरवण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे या संदर्भात तक्रारही करता येत नाही. परिणामी अव्वाच्या-सव्वा शुल्क आकारून क्लासेस सुरू आहेत.

घरांमधील शिकवणीवर कुणाचेही नियंत्रण नाही
खासगीशिकवण्या सुरू करण्यासाठी कुठेही नोंदणी होत नाही. संबंधित विषयांचे शिक्षण घेऊन शिक्षक शिकवणी सुरू करतात. शहरातील केवळ १० ते १५ टक्के खासगी शिकवणीचालक आयकर भरतात. कुणी भाडेतत्त्वावर जागा घेतल्यास त्या जागेचे शॉपअॅक्ट लायसन्स काढतात. व्यावसायिक कर भरतात. मात्र, घरांमध्ये भरणा-या शिकवण्यांवर कोणाचेच नियंत्रण नसते. शासनाने अध्यादेश काढून कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना खासगी शिकवणी घेण्यास मनाई केली आहे. मात्र, हा नियम पाळला जात नाही.
बातम्या आणखी आहेत...