आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Education With Hi Fi Service In Bhusawal College

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणवत्तेला प्राचार्य देणार नवा आयाम; ज्ञानासोबत मिळणार हायफाय सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. प्रवेश घेण्यापासून ते आवश्यक त्या दाखल्यांची जमवाजमव करण्यात विद्यार्थी व्यस्त आहेत. यंदा बारावीचे जेमतेम लागलेले निकाल पाहता अनेक महाविद्यालयांना मंजुरीएवढे विद्यार्थी आणायचे कुठून या चिंतेने ग्रासले आहे. मात्र, या पलिकडे जावून विभागातील बहुतांश प्राचार्यांनी ग्रामीण भागातील गुणवत्तेला नवा आयाम देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
केवळ एका वर्गातून दुसर्‍या वर्गात जाण्यासाठी शिक्षण, एवढय़ातच गुरफटून न राहता स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी परीक्षा आणि त्यासाठी अभ्यास या नव्या संकल्पनेवर भर देण्याचा संकल्प विभागातील बहुतांश प्राचार्यांनी केला आहे. काही ठिकाणी स्पोकन इंग्लिश, रेशिम उद्योगावरील डिप्लोमा आणि प्रमाणपत्र कोर्स आहे. बनाना व्हॅल्यू अँडिशनचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय पर्यटन, वाणिज्य शाखेतील व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती संधी आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यावसायिक दृष्टीने पाहणे शक्य होईल. स्पर्धा परीक्षांवर भर देणारे नियोजनही काही प्राचार्यांकडून तयार करणे सुरू आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यास आणि मुलाखत तंत्र समजावून सांगण्यासाठी अधिकाधिक कार्यशाळा असे हे नियोजन आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने महाविद्यालयातील ग्रथांलयांना देशपातळीवर ग्रंथालयांसोबत जोडण्याचे महत्त्वाचे काम काही ठिकाणी हाती घेतले जाणार आहे. कोटेच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी, जागतिक पातळीवर अपेक्षित असलेल्या बदलांचा विचार करता ज्या-ज्या गुणवत्ता आवश्यक आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये कशा वाढीस लागतील यावर आमच्या महाविद्यालयात भर देण्यात येईल, असे सांगितले. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबत सामाजिक मूल्य वाढीसाठी जनजागृती गरजेची आहे. सामाजिक मूल्य वाढीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर बोथट झालेल्या भावनांना संवेदनशील करता येईल. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण्यासही मदत होईल, असे त्यांचे नियोजन आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षेबाबत प्रोत्साहनाचा मानस आहे.
पालकांशी थेट संवाद
मुलभूत अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देतो. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग, मुलाखती कशा द्याव्यात याच्या कार्यशाळा घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उपक्रम यशस्वी होत आहे. यावर्षी याच क्षेत्रात भरीव काम करण्याचा मानस आहे. हा सर्व खर्च महाविद्यालय करते. याशिवाय गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांशी थेट संवाद साधण्यावर भर असतो. प्राचार्य डॉ. आर.पी.फालक, भोळे महाविद्यालय, भुसावळ
जॉब प्लेसमेंटवर भर
इंटरनेटचा वापर करून महाविद्यालयील ग्रंथालय देशभरातील सर्व ग्रंथालयांना जोडण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. कमवा शिका योजनेत विद्यार्थी सहभाग वाढवण्यावर भर असेल. राष्ट्रीय छात्रसेनेचे मुलींचे स्वतंत्र युनिट सुरू करण्याची आमची तयारी आहे. महत्त्वाचे म्हणजे प्लेसमेंट सेलतर्फे परिसर मुलाखतींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनींना आमंत्रण देण्यात येईल. प्राचार्य डॉ.जी.पी.पाटील, धनाजीनाना महाविद्यालय, फैजपूर
कुशल मनुष्यबळ निर्मिती
सरकार निर्णयानुसार अभियांत्रिकीच्या सर्व शाखांचे बोर्ड ऑफ चेअरमन हे पीएच.डी. केलेलेच असावेत. तयार होणारा अभ्यासक्रम त्या-त्या भागातील कारखानदारी, उद्योग-व्यावसायांना डोळ्यासमोर ठेवून तयार व्हावा. कारखानदारीला अपेक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण झाल्यास भरभराटीला चालना मिळेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविद्यालयीन, विद्यापीठ कार्यक्षेत्रात उच्च् शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेणारी व्यवस्था निर्माण व्हावी. पुणे, मुंबईत मिळणार्‍या सुविधा आपल्याकडे उपलब्ध करून देतो. प्राचार्य डॉ. बिमलेशकुमार, जे.टी महाजन, अभियांत्रिकी, फैजपूर
परीक्षा, स्पर्धात्मक जग
-महाविद्यालयात पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि या माध्यमातून आदर्श नागरिक घडविण्यावर आमचा भर आहे. युजीसी नेटवर्क सेंटरच्या माध्यमातून जगभरातील ज्ञान उपलब्ध महाविद्यालयात मिळू शकते. पुढील वर्गात जाणे एवढेच ध्येय न ठेवता अभ्यास करून परीक्षा दिली तरच स्पर्धात्मक जगात टिकता येईल, हे विद्यार्थ्यावर बिंबवणार आहोत. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यासाठी स्पोर्टस् सेंटर उघडले आहे. त्याचे चांगले परिणाम समोर येत असल्याचे समाधान आहे. प्राचार्य डॉ. आर.टी.चौधरी, व्ही.एस नाईक महाविद्यालय, रावेर