आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational News In Marathi, NMU Jalgaon Issue At Jalgaon, Divya Marathi

जपानमध्ये मिळणार उच्च शिक्षणाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खान्देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक दालन खुले करून देणार्‍या सामंजस्य करारावर जपान येथील तोकुशिमा विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यावतीने स्वाक्षरी करण्यात आली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जाता येणार आहे.

कुलगुरू सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत रविवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तोकुशिमा विद्यापीठातर्फे अधिष्ठाता व आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. तोशिहिरो मोरिगा यांनी व उमवितर्फे कुलसचिव प्रा. ए.एम.महाजन यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. या वेळी समन्वयक डॉ. पंकज कोईनकर, बीसीयूडीचे संचालक डॉ. डी.जी.हुंडिवाले, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एल.माहेश्वरी आदी उपस्थित होते.
पीएचडीसाठीही संधी
या करारांतर्गत दोन्ही विद्यापीठातर्फे 8 ते 10 विद्यार्थ्यांना दर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान केमिकल, मेकॅनिकल, बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल, आर्किटेर, आपत्ती व्यवस्थापन या विषयाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. तसेच पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करण्यासाठी विद्यार्थी दोन्ही विद्यापीठांमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. उमवित डिसेंबरमध्ये होणार्‍या ग्लोबल बायोटेक फोरम या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता तोकुशिमाच्या प्रतिनिधींना उपस्थितींचे निमंत्रण कुलगुरू मेर्शाम यांनी दिले.
समर ट्रेनिंगसाठी पाच विद्यार्थ्यांना संधी
जपान सरकारच्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठात जुलै व ऑगस्ट 2014मध्ये एक महिन्याकरिता ‘समर स्कूल ट्रेनिंग प्रोगॅ्रम’साठी पाठवण्यात येणार आहे. यात विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील दोन आणि जैवतंत्रज्ञानाच्या एका विद्यार्थ्याला संधी मिळेल. तर संलग्नित महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनाही ही संधी मिळेल. यासाठी लागणारा 50 ते 60 टक्के खर्च तोकुशिमा विद्यापीठ करणार आहे.