आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या ‘एक खिडकी’ योजनेतून दाखले मिळणार पंधरा दिवसांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेच्या कारभारात पारदर्शकता येऊन कामकाजाला गती मिळण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार्‍या ‘एक खिडकी’ योजनेसाठी माहिती संकलनाचे काम गतीने सुरू झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत पहिल्या टप्प्यात जन्म-मृत्यूच्या नोंदीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रशासनातील सखोल माहिती नोंदवली जाणार असल्याने मनपाची आर्थिक स्थिती ऑनलाइन कळणार आहे.
एक खिडकी योजनेसाठी पुणे येथील अवंती सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीची निविदा मंजूर झाली होती. परंतु या कंपनीने बॅँक गॅरंटीचे 25 लाख रुपये न भरल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा फेरविचार मनपाने केला होता. त्यानंतर नाशिक येथील इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा.लि. कंपनीला काम सोपविण्यात आले होते. गेल्या महिन्यातच बीएसएनएलची लिज लाइन सेट करण्याची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. तसेच डाटा एन्ट्रीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मनपाच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या एक खिडकी योजनेतून येत्या पंधरा दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदीचे अर्ज उपलब्ध होणार आहेत. महापालिकेत वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर हे इंदूर येथील महापालिकेतही वापरले जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे जळगावकरांना घर बसल्या कराचा भरणा ऑनलाइन करता येणार असून आपल्याकडील थकबाकी व भरणा याची परिपूर्ण माहिती कळणार आहे. तसेच कोणत्या विभागातून किती भरणा झाला, अथवा तक्रारींचा निपटार्‍याचीही माहिती मिळणार आहे.