आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंसमोर गड शाबूत ठेवण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन या दोन दिग्गज नेत्यांनी आपल्या वारसांना निवडून आणण्यासाठी रावेर मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आघाडीत बंडाचे निशाण फडकवणारे कॉँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. मतविभागणीच्या शक्यतेमुळे खडसेंसमोर गड शाबूत ठेवण्याचे आव्हान असेल.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन, कॉँग्रेसचे सहयोगी एक आणि भाजपचे तीन आमदार आहेत. म्हणजे भाजप व आघाडीचे समान बलाबल आहे. विधान परिषद सदस्य असताना राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांनी पालिकांमध्ये ज्या स्थानिक पातळीवर आघाड्या स्थापन झाल्या आहेत त्यांच्याशी बर्‍यापैकी ‘मतसंबंध’ प्रस्थापित केले आहेत. परंतु या आघाड्यांमध्ये काही ठिकाणी खडसेंचे समर्थक आहेत याचीही त्यांना जाणीव आहे.

विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचा पत्ता कट करून खडसेंनी यंदा आपल्या सूनबाई रक्षा यांच्यासाठी उमेदवारी आणली.
मात्र, त्यांचा अर्ज भरताना खडसेंनी जावळेंसह शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना सोबत आणून युतीत कोणतीही नाराजी नसल्याचे दाखवून दिले. मात्र, साखर कारखान्याचे माजी चेअरमन अ‍ॅड. घनश्याम पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेला अनपेक्षित धक्का बसला आहे.

गटबाजीचे मोठे आव्हान
सर्वाधिक मतदार असलेल्या भुसावळात भाजप व राष्ट्रवादीसमोर गटबाजीचे आव्हान आहे. भुसावळ पालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकी संघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. परंतु पालकमंत्री संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यापैकी नेता कुणाला मानायचे, असा प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेला नाही. एकीकडे खडसे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत. दुसरीकडे पालकमंत्री संजय सावकारे हे थेट खडसेंचा खरपूस समाचार घेतील का, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. भाजपतही अनिल चौधरींच्या संभाव्य प्रवेशाचे कवित्व अजूनही सुरूच आहे. जामनेर, मुक्ताईनगरात भाजपचे नेटवर्क मजबूत आहे.

लेवा मतांची विभागणी
भाजपच्या रक्षा खडसे व बंडखोरी करणारे डॉ. उल्हास पाटील हे दोघे लेवा पाटीदार समाजाचे आहेत. गेल्या वेळी या समाजाचा एकच उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे या वेळी या समाजाच्या मतांची विभागणी होऊ शकते. डॉ. पाटील यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघ पिंजून काढला आहे, तर खडसेंनाही मानणारा मोठा वर्ग आहे. आम आदमी पार्टीचे राजीव शर्मा, बसपचे डॉ. दशरथ भांडे हे मतदारांपर्यंत कितपत पोहोचतात? त्यांच्यासाठी स्टार प्रचारकांच्या किती सभा होतात? हा विषयही महत्त्वाचा आहे.

लढाईतील अधिक-उणे
रक्षा खडसे

बलस्थाने : सासरे एकनाथ खडसेंचे पाठबळ, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती असल्याने राजकीय खाचखळग्यांचा अभ्यास.
उणिवा : मोठ्या निवडणुकीचा पहिलाच अनुभव, खडसेंची सून हीच एकमेव ओळख. मुक्ताईनगर तालुका वगळता गेल्या तीन वर्षांत भरीव जनसंपर्क नाही.

मनीष जैन
बलस्थाने : खासदार असलेल्या वडिलांचे पाठबळ, विधान परिषदेचे सदस्य असताना विकासाचे मांडलेले प्रश्न, आक्रमक शैली.
उणिवा : तळागाळातील कार्यकर्त्यांचे संघटन नाही, गटबाजीला खतपाणी घालण्याचा ठपका, राजकीय विचार अपरिपक्व.