आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ekanath Khadase Successful People Representative At Bhusawal, Divya Marathi

खडसेंचे शब्द ठरले बापुडे! ‘बांधिलकी’मध्ये यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- लोकप्रतिनिधीला आपण केलेल्या विकासकामांचा कार्यवृत्तांत जनतेसमोर ठेवावा लागतो. कै. रामभाऊ म्हाळगी यांनी हा आदर्श भारतीय जनता पक्षात घालून दिला आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिभाऊ जावळे यांनी ‘बांधिलकी’ कार्यवृत्तांत प्रकाशित केला आहे. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आपल्या संदेशात जावळेंच्या पाठीवर ‘यशस्वी लोकप्रतिनिधी’ अशी कौतुकाची शाब्दिक थाप मारली आहे. मात्र, उमेदवारी बदलाच्या खेळामुळे त्यांचे हे शब्द जावळे सर्मथकांना बापुडे वाटत नसतील तरच नवल.
रावेर मतदार संघासाठी खासदार जावळेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी खासदार म्हणून केलेल्या विकासकामांचा कार्यवृत्तांत ‘बांधिलकी’ नावाने प्रकाशित केला आहे. त्यात एकनाथ खडसेंनी दिलेला शुभेच्छा संदेश दुसर्‍याच पानावर ठळकपणे मांडण्यात आला आहे. त्यात राजकीय नेत्यांच्या विचारांची अभिव्यक्ती त्यांच्या भाषणांतून, कामातून, कार्यशैलीवरून होत असते. हरिभाऊंनी लोकप्रतिनिधी म्हणून रावेर लोकसभा क्षेत्रात लोकभावनेच्या तळमळीने केलेली कामे, संसदेत मतदार संघातील समस्या मांडून सरकारला जाब विचारला आहे. समस्या सोडवण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न त्यांची यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून छाप पाडणारीच ठरली आहे.’, असे नमूद करण्यात आले आहे. खडसेंच्या या शाब्दिक भावनांचे चिकित्सकपणे चिंतन, मनन केले तर जावळेंच्या संदर्भात कुठेच नाराजी नाही, असे असतानाही पक्षाने ‘विशेष परिस्थितीनुसार’ उमेदवारी बदलवण्यात येत असल्याचे कारण सांगून जावळेंचा पत्ता कट केला आहे. पर्यायाने रक्षा खडसेंना उमेदवारी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यानंतर यावल तालुक्यातील भालोद येथे जावळेंच्या निवासस्थानी जो नाराजीनाट्याचा अंक घडला तो सुद्धा बोलका ठरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाशी बांधिलकी कायम ठेवावी, असा संदेश देण्यासाठी खडसेंना गेल्या तीन दिवसांत दोन वेळा यावल, फैजपूरला भेट द्यावी लागली आहे.
खासदार जावळेंनी ‘बांधिलकी’ कार्यवृत्तांत प्रकाशित केला आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांच्या 10 हजार प्रती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच छापण्यात आल्या आहेत. प्रकाशनानंतर प्रातिनिधिक स्वरुपात एक हजार प्रती रावेर लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र, जेव्हापासून उमेदवारी बदलाच्या खेळाची संगीत खुर्ची सुरू झाल्याची कुणकुण लागली तेव्हापासून वितरण थांबवण्यात आले होते. आता ते रक्षा खडसेंच्या प्रचाराला लागले आहेत.