आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा आदेश अन‌् भोळेंचा नगरसेवकपदाचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यस्तरावर शहराचे प्रतिनिधित्व करावे लागणार असल्यामुळे नगरसेवक म्हणून वेळ देता येणे शक्य नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र सोमवारी आमदार सुरेश भोळे यांच्या वतीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे सादर केले. नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असलेल्या भोळेंना महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आदेश दिल्‍यामुळेच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्‍याचे सांगितले जात आहे.
गेल्या ३६ वर्षांनंतर भाजपला पहिल्यांदाच सुरेश भोळेंच्या निमित्ताने आमदारकी मिळाली आहे. महापालिकेत नगरसेवक असलेले सुरेश भोळे आमदार झाल्यामुळे ते राजीनामा देतील, असा कयास बांधला जात होता. परंतु मध्यंतरी त्यांच्या समर्थकांमध्ये भोळे आमदारकीसोबतच नगरसेवकपदही कायम ठेवतील, अशी चर्चा सुरू होती. कायद्यात अशी कोणतीच तरतूद नसल्याने नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे बोलले जात होते. मात्र, विधानसभेचे विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भोळेंनी नगरसचिव निरंजन सैंदाणे यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. या वेळी विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते डॉ. अश्विन सोनवणे, सुनील माळी, मनोज काळे, नितीन पाटील, रवींद्र पाटील, शिवदास साळुंखे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. राजीनामा देण्यामागे नैतिकता हा मुद्दा असला तरी एक व्यक्ती एक पद तसेच पक्षातील अन्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा देण्याच्या मुडमध्ये असलेल्या भोळेंना खडसेंनी आदेश दिल्यामुळे निर्णय घ्यावा लागल्याचेही बोलले जात आहे.
नगरसचिव नीरज सैंदाणे यांच्याकडे आमदार सुरेश भोळे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा देताना भाजपाचे गटनेते आश्विन सोनवणे, वामन खडके, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, विजय गेही आदी.