आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे-मनीष जैन एकत्र; अर्थात रेल्वेच्या डब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वे म्हणजे जनतेची मालमत्ता. भारताच्या विविधतेचं प्रतिबिंब. याच रेल्वेने दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चार पक्षांच्या नेत्यांना अनपेक्षितपणे एकत्र आणलं. निमित्त होतं मुंबई-जळगाव प्रवासाचं.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे अपक्ष सदस्य मनीष जैन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अँड.रवींद्र पाटील आणि कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील हे एकाच रेल्वेने एकाच डब्यातून जळगावला आले.
अर्थात, काही तासांचा प्रवास त्यांनी एकमेकांशी गप्पा मारत केला. अँड.रवींद्र पाटील आणि आमदार मनीष जैन हे दोघेही रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करू इच्छीतात. एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्याही नावाची चर्चा रावेर लोकसभा मतदारसंघात असून अनपेक्षितपणे एकनाथ खडसे यांचेही नाव समोर येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या तिघांनी रेल्वे प्रवासा दरम्यान काय गप्पा मारल्या असतील, याची उत्सुकता त्यांना एकत्र पाहाणार्‍यांना नक्कीच आहे.
शुभेच्छा देणे आणि घेणे
एकनाथ खडसे, मनीष जैन आणि अँड.रवींद्र पाटील या तिघांनीही आपण रेल्वेत एकत्र आलो होतो हे मान्य केले. काही वेळेच्या गप्पांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी औपचारीकपणे एकमेकांना शुभेच्छा देणे, घेणे आणि आशीर्वाद मागणे, यावरच भर राहिला. मिळालेल्या संधीचा फायदा घेत खडसे यांनी आपल्या शैलीत मनीष जैन आणि रवींद्र पाटील यांना राजकीय चिमटेही काढल्याचे त्यांचा संवाद ऐकणार्‍यांनी सांगितले.