आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीष जैन यांना एकनाथ खडसेंचा अप्रत्यक्ष इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर राष्ट्रवादीत जाण्याची भाषा करणार्‍यांनाही उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच ‘आत’ जावे लागेल, असा इशारा आमदार मनीष जैन यांचे नाव न घेता भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी बैठकीत दिला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बुथ रचनेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकार्‍यांची बैठक बुधवारी झाली. त्यात आगामी कार्यक्रमांची रूपरेषाही ठरवली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, खासदार हरिभाऊ जावळे, सुनील बढे, अँड.किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके आदी उपस्थित होते. मोठय़ा कालावधीनंतर पक्ष बैठकीला उपस्थित असलेले खडसे जिल्ह्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीविषयी काय बोलतात, याची उत्सुकता पदाधिकार्‍यांनाही होती.

‘आप’चा ‘ताप’

दिल्लीत ‘आप’कडे जनतेने वेगळ्या नजरेने पाहिले. ते काही वेगळे करीत नाही. आपलेच अनुकरण करीत आहेत. परंतु भाजपा प्रचारात कमी पडतोय. त्यामुळे ‘आप’चा ‘ताप’ कुठेना कुठे होणार असल्याची भीतीही खडसेंनी व्यक्त केली. दिल्लीचे सरकार केवळ ‘आप’चे नसून कॉँग्रेसचे असल्याचा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचे आवाहनही केले.

गुलाबराव देवकरांनंतर आता इतर रांगेत

लोकसभेसाठी ज्याचे नाव पुढे येते तो अडचणीत येतो. देवकरांचेही तेच झाले. खासदार ए.टी.पाटील हे दोन महिन्यांपूर्वी काहीसे धास्तावलेले होते. परंतु देवकरांना तिकीट मिळणार नाही हे त्यांना आधीच सांगितले होते. ते बाहेर पडणार नाहीत हे स्पष्ट आहे. आता डॉ.सतीश पाटील, वसंतराव मोरे यांची नावे पुढे आली असून तेही देवकारांनंतर रांगेत आहेत. कॉँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर राष्ट्रवादीत जाणार, असे म्हणणार्‍यांनाही उमेदवारीची वेळ येईपर्यंत ‘आत’ नाही जावे लागले तर माझे नाव बदलवा, असेही खडसेंनी सांगितले.

निवडून आलेले राहतात गैरहजर

सभेला 90 टक्के हजेरी असली तरी ती कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची आहे. 10 टक्के गैरहजर हे निवडून आलेले आहेत. त्यांनी कि मान उपस्थिती दिली पाहिजे. सैनिक कसा लढेल, त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. निवडून येणारेच कार्यक्रमाला येत नसतील तर चिंतेची बाब आहे. त्यांना जाणीव करून द्यायची गरज आहे, असे वक्तव्य खडसेंनी केले. या बैठकीला आमदार गिरीश महाजन यांची अनुपस्थिती होती.