आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Khadse And Ishwarilal Jain News In Marathi, Divya Marathi, Belganga Sugar Factory

‘बेलगंगा’ कारखान्याच्या मुद्याला खडसे व जैन यांच्याकडून बगल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - रावेर मतदारसंघात मैदानाबाहेर असलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व खासदार ईश्वरलाल जैन यांच्यातील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण गढूळ झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे. वास्तविक, दोघांनीही जिल्हा बॅँकेचे नेतृत्व केले असून, बेलगंगा साखर कारखाना सध्या जिल्हा बॅँकेच्याच ताब्यात आहे; परंतु बेलगंगा कारखान्याचा विषय त्यांच्याकडूनही बाजूला पडलाय. ते रावेर मतदारसंघात खिंड लढवत असले तरी, बेलगंगा पट्टय़ातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे मोठय़ा आशेने पाहतोय.
चाळीसगाव येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड यांनीच ‘बेलंगगा’चा विषय आपल्या भाषणात घेऊन आता नाथाभाऊंनीच हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी साकडे घातले. खडसे यांनी मात्र आपल्या भाषणात या विषयाला हात घातला नाही. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूतही फार वेगळी स्थिती नाही. मेळावा व जाहीर सभेत त्यांनीदेखील बेलगंगा कारखान्याच्या विषयावर जाहीररीत्या भाष्य केले नाही. नरेंद्र मोदी व महायुतीचे उमेदवार ए.टी.पाटील यांनाच दोन्ही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. यावरून दोन्ही बाजूने केवळ व्यक्तीकेंद्रित प्रचारावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येतेय. परिणामी, विकासाचे अनेक मुद्दे मात्र मागे पडत आहेत. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकर्‍यांचे अर्शू कोण पुसणार?
बेलगंगा साखर कारखाना बंद असल्याने दाभाडी, कन्नड व कोपरगाव येथील कारखान्यांना ऊस दिला गेला. तसेच दाभाडी साखर कारखान्याने ठरलेला 2200चा भाव न देता 1800 रुपयांचा भाव उसाला दिला. हाच प्रकार कोपरगाव साखर कारखान्याकडून झाला, तर कन्नड साखर कारखान्याकडून असंख्य शेतकर्‍यांना अद्याप पेमेंट येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, शेजारील मालेगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उसाला 2200चा भाव आणि त्याच कारखान्याकडून चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना 1800चा भाव दिला गेला. हा अन्याय सहन करता-करता ऊस उत्पादकांचे डोळे कोरडे पडले आहेत. त्यामुळे केवळ कोरडी सहानुभूती नको आहे; आमचा आता कोणत्याही पक्षावर विश्वास राहिला नाही, असा टाहो ऊस उत्पादक शेतकरी फोडत आहेत.
कवितेतील ओळींनी अशीही साद
‘तरुण आमचा व्यसनाधीन झाला, काम नाही हाताला, बंजारा जातो सहा महिने ऊसतोडीच्या कामाला, जर का बंद कारखान्याचा धूर निघाला तर लागेल तरुणाई कामाला, थांबेल बंजारा गावाला, दाम मिळेल कामाला..’
बंजारा समाजाची व्यथा सांगणार्‍या या ओळी निवडणुकीच्या निमित्ताने तांड्यातांड्यात कानावर आदळताहेत. बंजारा समाजातील तरुणांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुक्यात बंजारा समाजाचे प्राबल्य असून, दोन नंबरची मते त्यांचीच आहे. ऊसतोड हाच तांड्यातील लोकांचा व्यवसाय; परंतु हक्काचा बेलगंगा कारखाना बंद असल्याने त्यांनी सर्वच पक्षांना कवितेतील वरील ओळींनी साद घातली आहे. तसेच बंजारा क्रांती दलाच्या पदाधिकार्‍यांनी तांड्यातांड्यात फिरून समाजाच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.