आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसे ‘भावी मुख्यमंत्री’, जळगावातील सत्कार सोहळ्यात दानवेंकडून घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘भावीमुख्यमंत्री एकनाथ खडसे यांना वाढदविसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिनिधी म्हणून मी जळगावात आलो आहे,’असे जाहीर वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी जळगावात केले. त्यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. ‘मुख्यमंत्रिपदासाठीचा गेम मोठा असतो. त्यामुळे खडसेंना मी काही गोष्टी कानात सांगणार आहे’, असेही दानवे म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते विधानसभभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास खडसे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा भाजपचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तोच धागा पकडत दानवेंनी खडसेंना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या प्रकाराची चर्चा होती.

नव्या चर्चेला तोंड
मुख्यमंत्रीकोणाचा? या विषयावर आधीच शिवसेना- भाजपमध्ये स्पर्धा लागलेली आहे. तसेच भाजपमध्येही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र आता पक्षातील ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री दानवे यांनीच जाहीर कार्यक्रमात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून खडसेंच्या नावाची घोषणा केल्याने भाजपमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अपेक्षा का ठेवू नये?
‘मुख्यमंत्रीकोणाचा यापेक्षा महायुतीची सत्ता येणे पहिले लक्ष आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषय केला तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक मुख्यमंत्री झाले, कोकणापासून विदर्भापर्यंत अनेकांना ही संधी मिळाली. सरकार कोणाचेही असले तरी उत्तर महराष्ट्राला कधी संधी मिळाली नाही आणि न्यायही मिळाला नाही. या भागाचे प्रतिनिधीत्व म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा का ठेवू नये?,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.