आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ, राणेंना भाजपत प्रवेश नाहीच - एकनाथ खडसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होत आहे. त्यानंतर 15 ऑगस्टपूर्वी पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, नारायण राणे व छगन भुजबळ यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देणे अशक्य आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

धुळे येथील एका माजी मंत्र्यानेही भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही संपर्कात आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपात कोणत्या जागा कोणाकडे जातात, हे पाहून ते निर्णय घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. पूर्वी केवळ भाजप व शिवसेना या दोनच पक्षांची युती होती. मात्र आता आणखी घटक पक्ष वाढले आहेत. त्यांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या काही जागा कमी होतील.

आमच्या पक्षात बाहेरून कितीही मोठा नेता आला तरी उमेदवारी देताना पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणार्‍या कार्यकर्त्यांलाच प्राधान्य राहणार असल्याचेही खडसेंनी स्पष्ट केले.

महायुतीत मनसेला थारा नाहीच
महायुतीत आता कोणताही घटक पक्ष येणार नाही. त्यामुळे मनसेचा प्रश्नच येत नाही. मनसेची पाच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. सुरुवात असल्याने तरुणवर्ग तिकडे वळला होता. परंतु लोकसभेत त्यांना केवळ एक टक्का मतदान मिळाले. थर्ड पार्टीला मतदान करून विजयी होणार्‍या पक्षाचे नुकसान करू नये, याचा विचार आता जनताही करू लागली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरचा परिणाम जाणवणार नसल्याचा दावा खडसेंनी केला.

सोलापुरात धुसफूस
आपल्या मानधनातून दरमहा पक्षनिधीसाठी कपात करण्यात येणारे प्रत्येकी एक हजार रुपये यापुढे देण्यास सोलापूरमधील भाजपच्या आठ नगरसेवकांनी नकार दिला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी सोमवारी नगरसचिव ए. ए. पठाण यांच्याकडे दिले आहे. आतापर्यंत झालेल्या पैशाचा हिशेब द्या, अशी मागणी पक्षाकडे केल्याची माहिती नगरसेवक नागेश वल्याळ यांनी दिली. सोलापुरात भाजपचे 25 नगरसेवक असून त्यांच्याकडून दरमहा पक्षनिधी घेतला जातो. सहकार्याच्या भावनेतून नगरसचिव कार्यालयाच्या वतीने सदरचा निधी एकत्रित करून विरोधी पक्षनेत्याकडे पाठवत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांत शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात नगरसेवकांसह काही पदाधिकार्‍यांनी मोहीम उघडली आहे. याच वादातून या नगरसेवकांनी ही विरोधी भूमिका घेतला आहे. दरम्यान, आम्ही अधिकृतपणे कोणतीही कपात करत नाही. प्रभारी विरोधी पक्षनेत्याकडून याबाबतचे पत्र आले आहे, ते पाहून उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया नगरसचिव ए. ए. पठाण यांनी दिली.