आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी नाथाभाऊ म्हणाले- मी पक्ष उभारला, पण ऐनवेळी नवख्याला कॅप्टनशिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. - Divya Marathi
कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.
मुक्ताईनगर (जळगाव) - चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात पक्ष उभारणीचे प्रयत्न केले. कॅप्टनपदापर्यंत पोहोचलो. मात्र, ऐनवेळी नवख्या व्यक्तीस कॅप्टनशिप दिली. आताही मंत्रिपदाची चिंता नसून पक्षाने मला भरभरून दिलेले आहे. काहीही झाले तरी पक्षाची साथ सोडणार नाही. मात्र, दोष नसताना शिक्षा भोगावी लागत असल्याची खंत वाटते, अशा शब्दात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांसमोर मन मोकळे केले.
याच सभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येतील, असे संकेत दिले.
६४व्या जन्मदिनाच्या औचित्याने मुक्ताईनगर क्रीडा संकुलातील मैदानावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री खडसेंनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत ते काय बोलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. अनुषंगाने नेहमीच्या आक्रमक शैलीत खडसेंनी, रामायण-महाभारताचा संदर्भ देत कोणाचाही नामोल्लेख न करता दोन महिलांमुळे ‘सारं काही’ घडल्याचे सांगितले. राजकारणातील ४० वर्षांची तपश्चर्या एका मिनिटात संपल्याचे कार्यकर्ते विचारतात. मात्र, भाजपची बदनामी होऊ नये यासाठी मी स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजकीय जीवनात काम करताना अनेक बेरोजगारांना नोकऱ्या लावल्या, बदल्यादेखील केल्या. मात्र, कुणाकडून एक रुपयाही घेतला नाही.
पक्षवाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. अनेकवेळा शिवसेना, काँग्रेसकडून पक्षप्रवेशाची ऑफर आली. मात्र, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता जोमाने पक्षविस्तार सुरूच ठेवला. भाजप वाणी-मारवाड्यांचा पक्ष नसून बहुजनांचा पक्ष म्हणून उभा राहावा, यासाठी काम करत आहे. एवढेच नव्हे तर सन १९८९पासून एखादा अपवाद वगळता जिल्ह्यातून सतत दोन खासदार निवडून आणले. भाजपला सलग दोन खासदार देणारा जळगाव जिल्हा एकमेव असल्याचे ते म्हणाले. तसेच मीडिया ट्रायलचाही त्यांनी समाचार घेतला.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी, नाथाभाऊ खान्देशचे भगिरथ असून राजकीय जीवनात चढ-उतार येतात. मात्र, झालेल्या आरोपांमुळे पक्ष बदनाम होऊ नये यासाठी त्यांनी सर्व पदांना लाथ मारून राजीनामा फेकला. या अग्नीपरीक्षेतून नाथाभाऊ बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्रिपदच द्या
काही लोकांमुळे नाथाभाऊंना घरी बसावे लागले. उत्तर महाराष्ट्रातून आजवर मुख्यमंत्री झालेला नाही. नाथाभाऊंनी मुख्यमंत्री होण्यात गैर काय, असे संजय सावकारे म्हणाले.

पुन्हा मंत्रिमंडळात?
एकनाथ खडसे हे केवळ जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. ते आज जरी सत्तेत नसले तरी त्यांचे सरकारमध्ये अद्यापही अस्तित्व कायम आहे. लवकरच त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खडसेंंनी सांगितला 40 वर्षांचा इतिहास
- दाऊदच्या पाकिस्तानातील घरी फोन, जावयाची लॅम्बॉर्गिनी कार, भोसरीतील भूखंड, कारखान्यासाठी हजारो एकर जमीन लाटल्याच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
- या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे ठासून सांगत एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांशी लढलो असतो पण स्वपक्षीयांनीच घात केला.
- राजीनाम्याचे शल्य खडसेंनी यावेळी बोलून दाखविले. कोणत्या पक्षात गेले पाहिजे हे ही न कळणाऱ्या वयात तत्कालीन जनता पार्टी आणि आजच्या भारतीय जनता पक्षाची कास धरली.
- 40 वर्षांपूर्वी हा पक्ष राजाभाऊ आणि मी जिल्ह्यात, गावागावत फिरून उभा केला, असे खडसेंनी सांगितले.
काय-काय म्हणाले नाथाभाऊ
- भाजप बदनाम होता कामा नये म्हणून राजीनामा दिला.
- जळगाव जिल्ह्यात भाजप मोठा करण्यात माझाही छोटा वाटा होता, म्हणून राजीनामा देऊन मोकळा झालो.
- ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यापैकी एकानेही अजून पुरावे दिलेले नाही.
- सायकलवर फिरून स्वतःच्याच सभेचा प्रचार करत होतो.
- हातगाडीवर लाउड स्पिकर आणि बॅट्री ठेवून एका हाताने गाडा ढकलायचा आणि दुसऱ्या हातात माइक घेऊन सभेला उपस्थित राहाण्याचे आवाहन करायचे, हा 40 वर्षांचा काळ आज डोळ्यासमोर उभा राहात आहे.
ये मुस्कूराती जिंदगी जिंदादिली का नाम है...
- मंत्रीपद गेल्यानंतरही खडसेंच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले नाही. याचे रहस्य सांगताना त्यांनी एक हिंदी शायरीचा आधार घेत म्हटले, ये मुस्कूराती जिंदगी जिंदादिली का नाम है...
वाढदिवसाला कोण-कोण उपस्थित
- एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या जाहीर कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.
- जाहीर सभेआधी उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- मंत्रीपद गेल्यानंतर खडसेंचे हे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नाथाभाऊंचे शक्तीप्रदर्शन....
बातम्या आणखी आहेत...