जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काळ्या पैशाचे व्यवहार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यभर तपासणी सत्र सुरू केले आहे. सोमवारी पुणे, जळगाव, मालेगाव व अमरावतीत या पथकांनी एकूण 86 लाखांची रक्कम जप्त केली. मालेगाव छावणी पोलिसांनी सटाण्याहून जळगावकडे जाणार्या इनोव्हा गाडीतून संशयास्पद असलेले रोख 16 लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी वाहनमालक भाऊसाहेब दादाजी देवरे (रा. जळगाव) यांच्यासह वाहन ताब्यात घेतल्यानंतर 16 लाख रुपयांची रक्कम सापडली. तसेच अमरावतीत पोलिसांना पाच लाख 67 हजार रुपयांची रोकड जप्त केली.
पुण्यात 53 लाख जप्त
पुण्यात एका कारमधून 53 लाख रुपये जप्त केले. याप्रकरणी नवनाथ सणस व लक्ष्मण बाबासाहेब शिंदे यांना अटक केली आहे. पोलिसांनी पुष्प मंगल कार्यालयाजवळ एक कार वेगाने जात होती. या वेळी पोलिसांनी कार थांबवून तिची पाहणी केली असता त्यात 53 लाख रुपये सापडले.
जामनेरमध्ये सहा लाख जप्त
निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने औरंगाबादकडून पहूरकडे सहा लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन येणारी गाडी वाकोदजवळ पकडली. एम.एच.12 केजे 7503 ही महिंद्रा कॉंन्ट्रो गाडी सोमवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान औरंगाबादकडून पहुरकडे येत होती. त्यावेळी भरारी पथकाने तपासणी केली असता गाडीत विवेक मते यांची सहा लाख एक हजार रूपयांची रोख रक्कम आढळून आली. रक्कम घेऊन आलेली ही गाडी भुसावळला जात होती. विवेक मते यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे येथील प्लॉट विक्रीतून ही रक्कम मिळाली असल्याचे त्विवेक मते यांनी पथकाला सांगीतले. पथक प्रमुख यु.सी.देशपांडे, पहुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय साळूंखे यांनी ही कारवाई केली.
देशात 195 कोटी जप्त, महाराष्ट्र तिसरा
निवडणूक आयोगाने नेमलेल्या आयोगाने आतापर्यंत देशात 195 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणांत 11 हजार एफआयआर दाखल झाले आहेत. सर्वाधिक रक्कम आंध्र प्रदेशात जप्त झाली असून, महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे.आंध्र प्रदेश 118 कोटी, तामिळनाडू 18.31 कोटी, महाराष्ट्र 14.40 कोटी, उत्तर प्रदेश 10.46 कोटी रुपये जप्त केले आहे.