आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commissioner Of Maharashtra Neela Satyanarayan In Jalgaon

राज्यातील शहरांच्या तुलनेत जळगाव बनलंय राजकीयदृष्ट्या संवेदनशील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘जळगाव शहर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नव्हे; राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे. त्यामुळेच आपण संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत,’ असे सांगत होत्या राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भातील हरकतींवर सुनावणीसाठी त्या दोन दिवसांच्या जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. हा दौरा संपवून परतण्यापूर्वी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी विशेष संवाद साधला.

प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव असलेल्या आणि मनाने कवी, साहित्यिक असलेल्या नीला सत्यनारायण यांनी आपली मते उघड केली. जळगावचा उल्लेख अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी ‘संवेदनशील’ असा केला होता. तो संदर्भ देऊन त्यांना शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी खराब वाटली का? असे विचारत संवादाला सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी हे शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले असल्याचे निरीक्षण नोंदवले.

अधिकारी नव्हे लेखिकाही
राज्यातील वरिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळून साहित्य प्रेमाला वेळ देणार्‍या नीला सत्यनारायण यांनी आतापर्यंत बरेच गद्य व पद्य लिखाण केले आहे. यात निवडणूक कार्यालयातील आव्हानात्मक काम करताना आलेल्या अनुभवातून साकारलेले ‘टाकीचे घाव’, आधुनिक काळातील स्त्रियांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी ‘ओळखीची वाट’ तसेच ‘रात्र वणव्याची’, ‘एक पूर्ण-अपूर्ण’, ‘एक दिवस जीवनातला’ या साहित्याचा समावेश आहे.

लिखाण सुरूच आहे
लहानपणापासूनच मला कविता करण्याची आवड होती. गेल्या पाच वर्षांपासून गद्य लिखाणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आलेल्या अनुभवातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रातून सध्या ‘सगुण निगरुण’ सदर लिहित आहे. त्याचेच पुस्तक करण्याचा विचार आहे. नीला सत्यनारायण, आयुक्त, राज्य निवडणूक आयोग.

नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात..
0 निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभर फिरावे लागते. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव शहराचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत शांतता दिसते. मात्र, राजकीय अस्वस्थता जाणवल्याशिवाय राहात नाही.

0 काटेरी मुकुट मानल्या जाणार्‍या राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या पदासाठी आपण योग्य असल्याचा विश्वास दाखवला. त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारली.

0 राजकारण्यांकडून आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी आम्ही जशी काळजी घेतो, तसेच निवडणूक आयुक्त म्हणून काम करताना आम्हालाही आचारसंहितेचे पालन करावे लागते.

0 महिला निवडून येतात पण प्रत्यक्ष कामकाजात त्यांचा अपेक्षित सहभाग नसतो. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी ‘क्रांतिज्योती’ या नावाने प्रशिक्षण दिले. 10 जिल्ह्यात 10 हजार महिलांना प्रशिक्षण दिले. हाच उपक्रम राज्यात राबवणार आहे.

0 राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी प्रभाग रचना फुटण्याची घटना केवळ जळगावातच घडली असे नाही तर यापूर्वी इतर पालिकांमध्ये असे प्रकार घडलेत. ही बाब आयोगाने गांभीर्याने घेतली आहे, असे प्रकार घडू नये म्हणून गंभीर पावले उचलली जातील.

0 दिवसेंदिवस महागाईत वाढ होत आहे. म्हणून 2012 मध्ये खर्चाच्या र्मयादेत वाढ केली होती. वाढती महागाई लक्षात घेता पुन्हा असा निर्णय घेऊ. अशा स्वरूपाचे निर्णय एखाद्या पालिकेसाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी असतील.