आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची तयारी : धुळे शहरात एकवीस दिवसांमध्ये 35 हजार मतदारांची नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवमतदारांसाठी 9 ते 30 जूनदरम्यान विशेष नावनोंदणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत एकवीस दिवसांत 35 हजार 501 नवमतदारांची नोंदणी झाली. त्याचबरोबर 778 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.

देशात सन 2009मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात कमी मतदान झाले होते. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार नावनोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांची नावे मतदार यादीत नव्हती. त्यांना मतदार यादीत नावे समाविष्ट करता यावी, त्याचबरोबर ज्यांचे वय 1 जानेवारी 2014 रोजी 18 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांना मतदान करता यावे यासाठी ही मोहीम राबविली गेली. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत 21 दिवसांत एकूण 36 हजार 10 जणांनी नावनोंदणीसाठी, 792 जणांनी मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी, तीन हजार 921 जणांनी नाव, छायाचित्र दुरुस्तीसाठी अर्ज केले तर 400 जणांनी ओळखपत्रासाठी फोटो जमा केले. छाननीनंतर सर्व माहिती परिपूर्ण असलेले अर्ज पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून 35 हजार मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सर्व मतदारांना लवकरच छायाचित्र असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे.

धुळे ग्रामीणमध्ये सर्वाधिक नोंदणी
जिल्ह्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ आहेत. या संघात धुळे ग्रामीण मतदार संघातून सर्वाधिक मतदारांनी नोंदणी केली. मतदारसंघात नाव नोंदणीसाठी दाखल झालेले 97 अर्ज नामंजूर झाले.

उद्दिष्टापेक्षा तीन हजार अधिक नोंदणी
या मोहिमेत अंदाजे 32 हजार नवमतदारांच्या नावनोंदणीचे उद्दिष्ट होते ; परंतु मोहिमेला प्रसारमाध्यमातून देण्यात आलेली प्रसिद्धी आणि मतदानाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या जागृतीमुळे अधिक प्रमाणात नावनोंदणीला प्रतिसाद मिळाल्याने उद्दिष्टापेक्षा तीन हजार अधिक नोंदणी झाली आहे.

शिंदखेड्यात सर्वात कमी नोंदणी
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी चार हजार 462 मतदारांनी नाव नोंदणी केली. मतदारसंघातून 71 मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले तर 350 जणांच्या नावात दुरुस्ती झाली. मतदारसंघात 94 मतदारांचे अर्ज अपूर्ण माहिती व कागदपत्र जोडले नसल्याने नाकारण्यात आले.