आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढवायची...? शौचालयाचा दाखला आणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला आता आपल्या घरी शौचालय असून त्याचा वापर करीत असल्याचा ग्रामपंचायत व ग्रामसभेचा दाखला द्यावा लागणार आहे. यासाठी 19 जानेवारीला राज्यात सर्वत्र ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या सभेतून इच्छुक उमेदवाराला हा दाखला घ्यावा लागणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने तत्काळ हा निर्णय घेऊन आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांपासून ते सर्वच उमेदवारांसाठी शौचालयाची अट निवडणूक आयोगाने घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील 1254 ग्रामपंचायत सदस्यांना 10 जानेवारी 2012 पर्यंत शौचालय बांधण्याची मुदतवाढ शासनाने दिली होती. ही मुदत संपल्याने निवडणुकीच्या आधी शासनाने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत अर्ज भरण्यास 18 जानेवारीपासून सुरुवात होत असून 23 जानेवारीपर्यंत त्याची मुदत आहे. यामुळे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 19 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेतून उमेदवाराच्या घरी शौचालय असून तो त्याचा वापर करीत आहे, यासंबंधीचा ग्रामसभेच्या ठरावासह ग्रामपंचायतीचा ठरावही या दिवशी दिला जाणार आहे. या ठरावाशिवाय उमेदवाराला निवडणूक लढवता येणार नाही.
कायद्याचे पालन होईल का?
शासनाने पाणंदमुक्तीसाठी ही मोहीम राबवली असली तरी या कायद्याचे पालन होईल का? याविषयी साशंकता आहे. स्थानिक स्तरावरून ग्रामपंचायतीला हाताशी धरून शौचालय नसलेल्या इच्छुकांना ते मिळवणे फारसे अवघड नाही. यामुळे शासनाने तातडीने काढलेला हा अध्यादेशाचा कितपत फायदा होईल याविषयी नागरिक साशंक आहेत.