आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Postponed, Demanded Political Parties To Chief Election

‘जळगाव मनपा निवडणूक पुढे ढकला’, राजकीय पक्षांची मुख्‍य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महानगरात अस्तित्वात नसलेल्या 66 हजार 733 मतदारांच्या नावे महापालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान करता यावे यासाठी महापालिकेतील सत्ताधार्‍यांना निवडणूक यंत्रणा मदत करीत असून, त्यात राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणदेखील सहभागी झाल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणीही मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

गुरुवारी सायंकाळी मुख्य निवडणूक आयुक्तांना दोन पानांची लेखी तक्रार फॅक्स करण्यात आली आहे. त्यात हे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. 25 जुलै रोजी एका स्थानिक दैनिकात शहरातील या 66 हजार 733 मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात या मतदारांचा संबंधित प्रभागातील रहिवास कायमस्वरुपी संपुष्टात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांची नावे मतदार यादीतून का वगळण्यात येऊ नये याबाबत लेखी हरकत दाखल करण्यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी सात दिवसांची मुदतही जाहीर केली आहे. मात्र, जाहिरात प्रसिद्धीची तारीख आणि दिलेली मुदत म्हणजे विद्यमान सत्ताधार्‍यांना बोगस मतदान करवून घेता यावे म्हणून केलेली व्यवस्था आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी केला आहे.

अशा साधल्या वेळा
महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारुप मतदार यादीवर निवडणूक विभागाने 27 जुलैपर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर या मतदार यादीला अंतीम स्वरूप प्राप्त होईल ज्यात शहरात ठावठिकाणा नसलेल्या या 66,733 मतदारांचाही समावेश असेल.

मात्र, आजच्या जाहिरातीनुसार त्यांच्यासंदर्भात हरकती 1 ऑगस्टपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांची नावे शहराच्या मतदारयादीतून वगळण्यात येतील. त्याआधीच 28 जुलैला महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदारयादीला अंतीम स्वरूप येणार असल्याने ही नावे या निवडणुकीसाठी मतदारयादीत असतील. त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस मतदान केले जाण्याची शक्यता आहे. ते शक्य व्हावे यासाठीच या तारखा जुळवून जाहिरात दिली गेल्याचा आरोप सर्व पक्षांतर्फे करण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या
मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात यावी, सर्व मतदारसंघातील मतदारसंख्या साधारणपणे सारखी असावी आणि या मतदारयादी घोटाळय़ाशी संबंधित सर्वच अधिकार्‍यांची, ज्यात नीला सत्यनारायणही आहेत, चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.


या बाबी संशयास्पद
0 बोगस मतदान न होण्याचा आयोगाचा उद्देश असताना मनपा निवडणुकीनंतर वगळणार बोगस मतदार
0 1 लाख 35 हजार मतदार वगळायचे होते, प्रत्यक्षात 19 हजार वगळले
0 निवडणूक कार्यक्रमापूर्वी नावे वगळण्याची संधी असताना चार दिवसांच्या फरकाने बोगस मतदारांना मतदानाची संधी

‘सेक्रेटरी’पदामुळे जवळीक
आमदार सुरेश जैन हे अन्न व नागरी पुरवठामंत्री असताना नीला सत्यनारायण त्यांच्या सेक्रेटरी होत्या. त्यामुळे त्या आमदार जैन यांच्या विश्वासातल्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांच्यासह निवडणूक विभागातले अधिकारीदेखील सुरेश जैन यांच्या आघाडीला मदत होईल असे काम करीत असल्याचा संशय आहे, असे सर्वपक्षीय निवेदनात म्हटले आहे.


तीन महिने निवडणूक नको
जळगाव शहरात अस्तित्वात नसलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणावर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. शासकीय जाहिरातीवरूनच हे स्पष्ट झाले. त्यामुळे आता ही निवडणूक तीन ते चार महिने पुढे ढकलावी, अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या फॅक्सद्वारे सर्व पक्षांतर्फे करण्यात आली आहे.

शिवसेना वगळता सर्व पक्ष एकत्र
निवेदनावर भाजपचे महानगराध्यक्ष सुरेश भोळे, काँग्रेस महानगराध्यक्ष अँड.सलीम पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव विनोद देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चौधरी, महानगर विकास आघाडीचे नरेंद्र पाटील, जनता दलाचे शफी पेंटर, प्रा. शेखर सोनाळकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.