आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपादकांच्या नजरेतून... अटीतटीच्या लढतींमुळे दिग्गजांची उडाली झोप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातून सुरू झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात निवडणुकीच्या मधल्या टप्प्यात खान्देशात येऊन धडकला. निवडणुकीची हवा मोदींच्या सभेनंतर बदलेल आणि भाजपला लाभ होईल, असे वाटत असतानाच महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा मुद्दा प्रादेशिक पक्षांनी उचलल्यामुळे पुन्हा एकदा भाजप बॅकफुटवर जाते की काय, असे वाटायला लागले होते. मात्र, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार नाही, याचा खुलासा मोदींनी दोंडाईचा (जि. धुळे) आणि एरंडोल (जि. जळगाव) येथील सभेत केला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात निवडणूक पुन्हा एकदा संघर्षमय होईल, हे स्पष्ट झाले.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पसरलेल्या खान्देशात विधानसभेचे २० मतदारसंघ आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय वर्चस्वाचे गणित आतापर्यत वेगळे होते. मात्र, यंदा प्रथमच पाच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. काही विद्यमान आमदार आणि इच्छुकांनी विचारधारा, पक्ष, निष्ठा बाजूला ठेवून आमदार बनण्यासाठी कोलांटउड्या मारल्या. त्यामुळे सर्वांनाच जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खडसे असो की जैन, गावित असो की गोटे कुणालाही विजय सोपा नाही. जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघ आहेत. त्यापैकी जळगाव शहर, ग्रामीणचे आमदार अनुक्रमे सुरेश जैन (शिवसेना), गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) हे घरकुल घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांची मुलं विशाल आणि राजेश हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

जैन, देवकरांची गैरहजेरी आणि पक्षांची स्वतंत्र उमेदवारी यामुळे खडसे यांनी भाजप उमेदवारांमागे ताकद उभी केली आहे. पस्तीस वर्षे आमदार राहिलेल्या जैनांनी शहराचे काय भले केले? उद्योग आले नाही की येऊ दिले नाही? शहराचा कसा खेळखंडोबा झाला? महापालिका कुणामुळे कर्जबाजारी झाली? हे प्रश्न घेऊन जैन विरोधक लोकांपुढे जात आहेत, तर जैन यांचे सुपुत्र राजेश हे जळगाव आज आहे ते ३५ वर्षापूर्वी कसे होते? हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जैनांवर मनसे उमेदवार ललित कोल्हे हेही तुटून पडले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवारांनी मात्र विकासावर भर दिला आहे. जळगावात होत असलेल्या अटीतटीच्या सामन्यात विजयाचे गणित जैनांना अवघड होत चालले आहे. विरोधी पक्षनेते राहिलेल्या खडसेंनाही एकतर्फी वाटत असलेली मुक्ताईनगरातील लढाई शिवसेना उमेदवार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अवघड बनवली आहे. त्यामुळे राज्यभरात फिरणा-या खडसेंच्या विजयासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मुक्ताईनगरात ठाण मांडले आहे. गिरीश महाजन यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही जामनेर या बालेकिल्ल्यात अटीतटीचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार डी. के. पाटील यांनी त्यांना निवडणूक जड केली आहे. पाटील यांना महाजन विरोधकही रसद पुरवत आहेत. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीतून भाजपत उडी घेतली आहे. खडसे सोबत असले तरी त्यांनाच लढावे लागत आहे. शिवसेनेचे संजय ब्राह्मणे हेही कडवी झुंज देत आहे. चोपड्यातही राष्ट्रवादीचे आमदार जगदीश वळवी यांनी मेहुणे डॉ. गावित यांच्या पाठोपाठ भाजपची उमेदवारी मिळवली खरी पण नाराज इच्छुक उमेदवार चंद्रकांत बारेला, शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीच्या माधुरी किशोर पाटील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे वळवी यांनाही विजय लांबचा वाटू लागला आहे. रावेरचे कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, चाळीसगावातील राष्ट्रवादीचे आमदार राजीव देशमुख यांनाही पंचरंगी लढतींमुळे संघर्ष करावा लागत आहे. अमळनेर, एरंडोलमध्येही अटीतटीचे सामने रंगत आहेत. एरंडोलमध्ये चिमणराव पाटलांना राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांचे तगडे आव्हान आहे. भाजपच्या मच्छिंद्र पाटलांना मोदींची सभा किती मते मिळवून देते यावरच त्यांचे गणित आहे.

धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. लोकसभेप्रमाणेच आताही लाटेवरच उमेदवार निवडून येतील, या भावनेने भाजपकडे इच्छुकांची गर्दी होती. मात्र, धुळ्याचे अपक्ष आमदार अनिल गोटे यांनी भाजपची उमेदवारी मिळवून स्थानिक नेते आणि इच्छुकांवर पहिला विजय मिळवला. गत निवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवून दिली आहे. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर मेहरबान होतेच. शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळे त्यांनीही काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे मेहुणे (शालक) सुभाष देवरे यांना उमेदवारी दिली आहे. देवरे यांचा चुलत भाचा उत्कर्ष पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून मतविभाजनाचे आव्हान दिले आहे. काँग्रेसने साबीर शेख यांना उमेदवारी देऊन भाजप, सेना उमेदवारांची निवडणूक सोपी करण्याचेच काम केले आहे. त्यामुळे धुळे शहराची निवडणूक अवघड बनली आहे. मुस्लिम, मराठा -पाटील समाजाच्या मत विभाजनाचा फायदा मिळवून जो मताधिक्य राखेल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे. मुस्लिम मत विभाजनाचा जसा राष्ट्रवादीच्या कमदबांडेंना फटका आहे, तसाच उत्कर्षच्या माध्यमातून देवरेंना आहे. संघ, भाजप गोटेंसोबत मनापासून आहे की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

धुळे शहरासारखीच परिस्थिती ग्रामीणची आहे. येथील शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील यांनाच पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रोहिदास पाटील यांनी प्रथमच मुलगा कुणाल यांना पुढे केले आहे. मुलासाठी ते एकटे फिरत आहेत. आतापर्यंत घरची एकदाही कानुबाई डोक्यावर घेतली नसेल एवढ्या गावोगावच्या कानुबाई मुलासाठी त्यांनी डोक्यावर घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार व िजल्हा परिषद सभापती किरण पाटील यांचेही कडवे आव्हान आहे. त्यांचा दांडगा संपर्क आहे. दुसरीकडे ज्यांच्या मदतीमुळे गत निवडणुकीत प्रा. शरद पाटील हे निवडून आले होते, त्या मनोहर भदाने यांनी स्वत:च भाजपतर्फे उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे धुळे ग्रामीणची लढतही काट्याची बनली आहे. साक्री, शिरपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपत लढत आहे. शिंदखेडा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार रावल आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभाही झाली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, काँग्रेसच्या श्याम सनेर यांचे आव्हान आहे. जातीपातीचे इथे राजकारण आहे. त्यामुळे मराठा मतविभाजनावर रावलांच्या विजयाचे गणित आहे.

नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. चारही आदिवासींसाठी राखीव आहेत. राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजप आणि त्यांच्या दोघा बंधूंनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा या पेक्षा इथे डॉ. गावित कुटुंबाविरुद्ध काँग्रेसएवढीच लढत आहे. डॉ. गावित भाजपत गेल्यामुळे संपलेली राष्ट्रवादी त्यांच्या आमदार बंधूंच्या म्हणजे शरद गावितांच्या प्रवेशामुळे जिवंत झाली आहे. शरद यांनी काँग्रेसच्या सुरूपसिंग नाईक यांना आव्हान दिले आहे. प्रचारात डॉ. गावितांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे. त्यामुळे डॉ. गावितांसह त्यांच्या बंधूंना निवडणूक जिंकणे अवघड झाले आहे. खान्देशातील दिग्गजांसह सर्वांच्याच मतदारसंघात विजय हुलकावणी देत असल्यामुळे उमेदवारांची झोप उडाली आहे.