आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी बिले द्या, मग वसुली करा; वीज ग्राहकांचा क्रॉम्प्टनला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील अब्जावधी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी क्रॉम्प्टनने वसुलीचा सपाटा लावला आहे. मात्र, बिलाचे पैसे भरण्यासाठी बिलेच हाती पडत नसल्याने ग्राहकांनी कंपनीला आधी वीजबिले हातात द्या व मग वसुली करा असे सुनावले आहे. शहरातील बहुतांश भागात ग्राहकांना वीजबिले वेळेत मिळत नसल्याने तसेच दोन ते तीन महिन्यांचे बिल एकाचवेळी येत असल्याने ग्राहक कमालीचे वैतागले आहेत. 15 कर्मचार्‍यांना पोसणारे कॉल सेंटर खंडित वीजपुरवठय़ाच्या तक्रारी सोडविण्याबाबत कुचकामी ठरत असल्याने ते बंद करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

नवीपेठेतील कॉर्पाेरेशन बँकेमागील डीपीवरील डीओ शनिवारी दुपारी बारा वाजता जळाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मी सातत्याने क्रॉम्प्टनच्या कॉल सेंटरवर 2232514 या क्रमांकासह 2232508 यावर तब्बल 40 वेळेस कॉल केले. अखेर एक तास 20 मिनिटांनी रिंग वाजली व कॉल सेंटर कर्मचार्‍याने आवाज दिला. संबंधित माहिती दिल्यावरही दीड तासाने दुरुस्तीचे काम झाले. माझे काम बंद राहून नुकसान झाले.
-अजय पाटील, नवीपेठ, वीजग्राहक क्रमांक 110013096457.

मी नियमित वीजग्राहक आहे. माझ्या घरातील विजेचा वापर दोन खोल्यांपुरता असताना माझे वीजबिल नेहमीच अवाच्या सव्वा येत असते. रीडिंग नियमित घेतात. बिले मात्र तीन महिन्याचे एकदाच यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कार्यालयात चकरा मारूनही काहीच उपयोग नाही. यापेक्षा आकडे टाकलेले परवडणारे आहे, असे वाटायला लागले आहे. आमच्या कॉलनीतील अनेक तक्रारी आहेत. आम्ही सामूहिक तक्रारी करूनही कंपनीला फारसा फरक पडत नाही.
-ज्योती वैद्य, ग्राहक क्रमांक 1110016663808, त्रिभुवन कॉलनी

ग्राहकांनी वेळेवर बिले भरल्यास थकित राहत नाही. कॉल सेंटरवर सातत्याने येणार्‍या कॉलमुळे ते एंगेज येतात, ग्राहकांनी एसएमएसचा वापर करावा. ग्राहकांच्या सेवेसाठी लवकरच सुविधा कक्षाची निर्मिती करीत आहोत, यामुळे विजेच्या असंख्य तक्रारी कमी होतील.
-डॉ.व्ही.पी.सोनवणे, युनिट हेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज

व्यवस्थापन गप्पच
फ्रॅन्चायझीनंतर दोन वर्षात क्रॉम्प्टनच्या कार्यालयात अनेक सुधारणा झाल्या. कॉल सेंटर, क्यूएमएस प्रणाली, मोबाइल बिल सेंटर सुरू करूनही वीजबिल व रीडिंगच्या तक्रारी अद्यापही सुटलेल्या नाहीत. यामुळे ग्राहकांबरोबरच क्रॉम्प्टनचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. मात्र, कंपनी व्यवस्थापनावर कठोर निर्णय घेण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. ग्राहकांना तक्रार क्रमांक दिले जातात, मात्र त्या तक्रार सोडविण्यासाठी कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. तारखांवर तारखा देऊनही त्या सुटतच नाही. ‘जैसे थे’ची स्थिती कायम राहत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. सर्वाधिक तक्रारी चुकीचे रीडिंग, अवास्तव बिल व कॉल सेंटरच्या आहेत, हे जाणूनही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या यंत्रणेत बदल करण्याकामी अपयशी ठरले आहेत.

फोनऐवजी करा एसएमएस
ग्राहकांकडून सातत्याने येत असलेल्या फोन्समुळे एंगेज टोन मिळत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यावर ग्राहकांनी 8806669600 या क्रमांकावर आपले नाव, संपर्क पत्ता व समस्या लिहून पाठवावे.