आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Company, Export The Ashes: Chandrashekhar Bavanakule

अाैष्णिक वीज केंद्राची राख दुबई, सिंगापूरला पाठवणार, बावनकुळे यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कोळशापासून तयार होणाऱ्या विजेनंतर उर्वरित राखेच्या विल्हेवाटीवर आता या राखेची निर्यात करण्याचा उपाय ऊर्जा विभागाने काढला आहे. यासंबंधीची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून लवकरच महानिर्मिती कंपनीत राख निर्यात धोरण लागू केले जाणार अाहे. या निर्णयामुळे महानिर्मितीला १५०० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, अशी माहिती विद्युत मंडळ विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
राज्यातील विविध औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्रावर कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. या वेळी कोळशाची राख मोठ्याप्रमाणात पडून असते. या राखेची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही कंपनीपुढे असतो. ही राख सिमेंट कंपन्यांना देण्याचे ऊर्जाविभागाचे धोरण आहे. मात्र, यानंतरही उर्वरित राखेचा गंभीर प्रश्न वीज कंपन्यांपुढे आहे. जळगाव जिल्ह्यातील दीपनगर वीज औष्णिक केंद्रावर दिवसाला ४ हजार मेट्रिक टन राख निर्माण होते.
राज्यात अधिकतर वीजनिर्मिती कोळशापासूनच केली जाते. यातून जी राख निर्माण होते त्या राखेची विल्हेवाट लावणे अत्यंत खर्चिक असते. यावर उपाय म्हणून लवकरच राख निर्यात धोरण जाहीर करण्यात येणार आहे. या राख निर्यातीतून महानिर्मितीला सुमारे १५०० कोटी रुपये मिळू शकतील, असा विश्वासही वीज मंडळाला आहे.
निधीतून गावाचा विकास
ज्या गावाजवळ वीजनिर्मिती केंद्र आहेत, तेथील राख विकून आलेल्या पैशातून त्या गावांचा विकास करण्याचा विचारही वीज मंडळाने केला आहे. या माध्यमातून महानिर्मिताला ७०० ते ८०० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. वीजनिर्मिती केंद्राजवळ आणि तलावांजवळ काही कंपन्यांना सिमेंट फॅक्टरीसाठीही जागा देण्याचा विचार शासनाधीन आहे. यामाध्यमातून राखेची विक्री होणार आहे. यासंबंधीचे अद्याप आदेश नसले तरी लवकरच यावर निर्णय शक्य असल्याने जनसंपर्क विभागाने कळवले आहे.
विदेशातून राखेला मागणी
औष्णिक वीज केंद्रातील राखेला सिंगापूर आणि दुबईत या देशांमध्ये मागणी आहे. यासाठी राख निर्यात धोरण तयार करून ते कॅबिनेटसमोर ठेवण्यात येणार आहे. या निर्यातीची परवानगी मिळाल्यानंतर राखेची निर्यात करता येणार आहे. यासह राज्यातील काही सिमेंट कंपन्यांनीही महानिर्मिती कंपनीकडे राखेची मागणी केली आहे. त्यांनाही राखेची विक्री केली जाणार अाहे.
सूचना नाहीत
^ऊर्जा विभागाच्या निर्णयाबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. मात्र, सद्य:स्थितीत दीपनगर औष्णिक केंद्रातील राख ही ओरिएन्टल सिमेंटला दिली जात आहे. सन २००९ पासून सन २०१८ पर्यंत हा करार केला आहे. मात्र, कंपनीचा निर्णय बदलल्यास या धोरणात बदल होऊ शकतो.
मोहन सरदार, जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती