आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात उडाला भारनियमनमुक्तीचा फज्जा; साडेपाच तास वीज गुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- वीज वितरण कंपनीने गणेशोत्सवासाठी शहरात भारनियमन बंद केले. मात्र, गणेशोत्सवाच्या दुसर्‍याच दिवशी मंगळवारी भ्रमाचा भोपळा फुटला. साकेगाव सबस्टेशनमधून निघणार्‍या 11 केव्हीच्या एलटी लाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी शहरातील उत्तर भागात सकाळी तब्बल साडेपाच तास वीजपुरवठा खंडित होता. या मुळे गणपती बाप्पाला उत्सव काळात दुसर्‍याच दिवशी अंधारात राहावे लागले. कंपनीचे भार व्यवस्थापन कोलमडल्याने तांत्रिक समस्यांनी डोके वर काढले आहे.

शहरातील उत्तर भागात वीज वितरण कंपनीचे शांतीनाथनगर आणि भुसावळ सिटी असे दोन फिडर आहेत. मंगळवारी सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी एलटी लाइनच्या तारा भिरुड कॉलनी परिसरात तुटल्याने दोन्ही फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाला. या मुळे शांतीनाथनगर, संपूर्ण जळगाव रोड, प्रभात कॉलनी, सतारे परिसर, आयोध्यानगर भाग, गणेश कॉलनी, नालंदानगर, शांतीनगर, तापीनगर, हिंदू हौसिंग सोसायटी परिसर, भिरुड कॉलनी आदी संपूर्ण भाग अंधारात सापडला. वीज वितरण कंपनीने सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास भुसावळ सिटी फिडरवरील 5 ट्रान्सफॉर्मरवर लोड (भार) वळवून शहरातील खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.

का येते वारंवार अडचण?
शहरानजीकच्या दीपनगर केंद्रातून राज्याला दररोज सरासरी 800 मेगाव्ॉट वीज मिळते. भुसावळ शहरात मात्र विजेची समस्या कायम आहे. विशेष म्हणजे शहरासाठी एकही स्वतंत्र सबस्टेशन नाही. पालकमंत्री संजय सावकारे यांनी ही गरज ओळखून दोन स्वतंत्र सबस्टेशन मंजूर करून आणले. वीज वितरण कंपनीने मात्र अजूनही काम सुरू केलेले नाही. शहरात सध्या साकेगाव, दीपनगर, चोरवड या सबस्टेशनमधून वीज घेतली जाते. पर्यायी जोडणी होत नसल्याने तांत्रिक अडचणीच्या वेळी शहरवासीयांना अंधारात राहण्याशिवाय पर्यायच नसतो.

असा होतो तांत्रिक बिघाड
सध्या भारनियमन बंद असल्याने वीज वापर वाढला आहे. गणेशोत्सवात आरास सजावट, रोषणाईमुळे वीज वापर अधिक होतो. या तुलनेत फ्रिक्वेंन्सी मिळत नसल्याने वीजपुरवठा सतत ट्रिप होतो. यानंतरही वीज प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास वीज तारा तुटणे, जंप नादुरुस्त होणे, ट्रान्सफॉर्मरचे डिओ तुटणे, इंन्सुरेटरमध्ये बिघाड असे प्रकार वाढतात.

अल्पकाळात शोधला बिघाड
शहरातील भार वाढल्याने वीजतारा तुटल्या. कर्मचार्‍यांनी अथक पर्शिम करून प्रथम बिघाड शोधला. यानंतर काही तासांतच पाच ट्रान्सफॉर्मरवरील भार पूर्ववत करण्यात यश आले. 11.30 वाजेदरम्यान संपूर्ण उत्तर भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
-पी. एस. शिंदे, कनिष्ठ अभियंता, शहर उत्तर भाग, भुसावळ

बिघाड दुरुस्त केला
भुसावळ उत्तर भागाचे कनिष्ठ अभियंता पी.एस.शिंदे आणि 10 कर्मचार्‍यांनी शांतीनाथ फिडरवरील भिरुड कॉलनी आणि आयोध्यानगर परिसरातील नालंदानगर जवळ तुटलेल्या वीजतारांची जोडणी केली. सकाळी 11.32 वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. जळगाव रोड भागातील विमल पाटीलनगरात सकाळी 10 वाजता वीज गेली. यानंतर उर्वरित उत्तर भागातील वीजपुरवठा पूर्ववत झाला तरी या भागात विजेचा पत्ता नव्हता.