आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांब्याच्या तारा, कॉइल चोरणारे रॅकेट गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या अाठवड्यात महावितरणच्या तांब्याच्या तारा, कॉइलची चाेरी करणाऱ्या पाच चाेरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी गजाअाड केले. त्यांनी आत्तापर्यंत ५० ट्रान्स्फाॅर्मरमधील तांब्याच्या तार, क्वाॅइल चोरल्याची कबुली दिली.
फिराेज किताब तडवी (बोरखेडा, ता.रावेर), संजय नथ्थू तडवी, फिरोज रमजान तडवी, राजू प्रतापसिंग चाैहान, शरीफ नसीर तडवी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी फिराेजकडून दोन तर संजयकडून महावितरणच्या तीन डीपींच्या क्वाॅइल पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत. या सर्व जणांनी आत्तापर्यंत जामनेर, बोदवड, रावेर भागातील ५० पेक्षा जास्त डीपींमधून तांबे चोरी केले आहे. रात्री वाजेच्या सुमारास ढाब्यावर जेवण करून ते खेड्यापाड्यांजवळ जाऊन चाेरी करीत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी रात्री पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम, भास्कर पाटील, सिद्धार्थ बैसाणे, विनोद चौधरी, मिलिंद सोनवणे, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, सुनील लोहार, मंगलसिंग पाटील, महेंद्र बागुल, दत्तू बडगुजर आणि विनायक पाटील यांच्या पथकाने दोन गट तयार करून सापळा रचला. सुरुवातीला फिरोज तडवी याला ताब्यात घेतले. त्यानंतर एकापाठोपाठ असे एकूण पाचही जण अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

जीवावर बेतून चोरी

चाेरट्यांची चोरी करण्याची पद्धत धोकादायक होती. डीपीजवळ पोहोचल्यानंतर ते लोखंडी पट्टीच्या साह्याने डीपीचे कनेक्शन ट्रीप करायचे. त्यामुळे त्यातील वीजपुरवठा बंद पडत असे. वीजपुरवठा बंद पडताच दोघे जण डीपी काढत असत. त्यानंतर डीपी फोडून त्यातील तांब्याच्या क्वाॅइल काढत. तसेच ते पळून जाण्यासाठी टाटा मॅजिक गाडीचा वापर करीत होते. अतिउच्चदाबाच्या विजेच्या तारा ट्रीप करून, डीपी फोडून कॉइल चोरण्याची त्यांची ही पद्धत प्रचंड धोकादायक होती. अशा वेळी मोठा अपघात होण्याची शक्यताही जास्त असते.

म्हाेरक्या मोकाटच
या प्रकरणातील म्हाेरक्या मेहमूद शहा हा अद्याप बेपत्ता आहे. मेहमूदने तीन वर्षांपूर्वी जळगाव कारागृहात शरीफ तडवीशी गट्टी केली होती. तेथेच नियाेजन करून त्याने शरीफला डीपीच्या चोरीसंदर्भात माहिती दिली होती. बाहेर पडल्यानंतर शरीफने मेहमूदशी संपर्क साधून तो त्याच्या गँगमध्ये सामील झाला होता. दरम्यान, चोरी केल्यानंतर मेहमूदच सर्व मुद्देमाल ठेऊन घेत होता. तसेच आपल्याला ५००-७०० रुपये देत होता, अशी माहिती शरीफने पोलिसांना दिली.