आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ मीटर नादुरुस्त असताना वीज कंपनीने मनपाला दिली अंदाजे बिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - वीजकंपनी तर्फे अव्वाच्या सव्वा बिले दिली जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. त्याचा प्रत्यय महापालिकेलाही आला असून, पथदिव्यांसाठी बसवण्यात आलेले २९ मीटर बंद असतानाही वीज कंपनीने महापालिकेला अंदाजे बिले दिली. त्यामुळे महापालिकेने आता वीज कंपनीकडे कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासाठी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
शहरातील विविध भागात पथदिवे लावण्यात आले असून, त्यांचे बिल महापालिका प्रशासनाकडून देण्यात येते. त्यानुसार महापालिकेला दरमहा सुमारे २३ ते २४ लाख रुपये वीजबिल भरावे लागते. पथदिव्यांसाठी शहरातील विविध भागात वीज मीटर बसवण्यात आले आहेत. या मीटरचे रीडिंग घेतल्यानंतर वीज कंपनीकडून महापालिकेला वीजबिल पाठवण्यात येते; परंतु सन २०१२पासून विविध भागात असलेले मीटर बंद हाेते. ते बदलण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने वीज कंपनीकडे केली होती; परंतु त्यानंतरही वीज कंपनीने मीटर बदलता अंदाजे बिल पाठवण्याचा सपाटा सुरूच ठेवला. त्यानंतर २०१५मध्ये वीज मीटर बदलण्यात आले. मीटर बदलल्यानंतर बिल कमी येण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यांचे वीजबिल त्यापूर्वी पाठवण्यात आलेल्या अंदाजे वीजबिलात मोठी तफावत आढळून आली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वीज कंपनीला अतिरिक्त वसूल केलेली बिलाची रक्कम परत करावी यासाठी पत्र दिले आहे.

६० लाखांच्या कामांचा प्रस्ताव
वीजवितरण कंपनीतर्फे शहरात तीन उपकेंद्र उभारली जाणार आहेत. त्यासाठी वीज कंपनीने मनपाकडे जागेची मागणी केली आहे. या जागेच्या किमती इतकी कामे वीज कंपनी महापालिकेला करून देणार आहे. वीज कंपनीतर्फे चाळीसगाव रोडवर उपकेंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी एक एकर जागा प्रस्तावित अाहे. या जागेची किंमत ६० लाख ६६ हजार आहे. या जागेच्या बदल्यात सुकवद, बाभळे येथील उपकेंद्राचे नूतनीकरण, मनपा इमारतीत एक नवीन ट्रान्स्फाॅर्मर, बडगुजर जलकुंभ म्हाडा कॉलनी येथील पंपिंग स्टेशनजवळ ट्रान्स्फाॅर्मर बसविणे आदी ६० लाख रुपयांची कामे करून द्यावी, असा प्रस्ताव मनपाचा आहे.

२०१२ पासून वसुली
पथदिव्यांचे वीज मीटर सन २०१२ पासून बंद होते. महापालिकेला वीजबिलाची रक्कम ७९ लाख ८१ हजार ९४८ रुपये येणे अपेक्षित होते. मात्र वीज कंपनीने महापालिकेकडून अॅव्हेरज बिलापोटी कोटी ३६ लाख ९८ हजार ७१६ रुपये वसूल केले. त्यामुळे अंदाजे वीजबिल पाठवून वसूल केलेल्या रकमेतून नवीन मीटर बसवल्यानंतर रीडिंगनुसार आलेल्या वीजबिलात कपात करावी. तसेच उर्वरित ८४ लाख १६ हजार ७६८ रुपये त्यावरील व्याज १५ टक्के प्रमाणे कोटी २६ लाख रुपये मनपाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...