आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफलातून प्रयोग! महावितरणची ‘बड्यां’साठी आगळीक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विजेची थकबाकी न भरल्याने क्रॉम्प्टनने शहरातील बिग बझारसह खान्देश सेंट्रलमधील 28 व्यावसायिकांची वीजजुळणी कापून कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आपलीच फ्रॅन्चाइजी असलेल्या क्रॉम्प्टनच्या नाकावर टिच्चून महावितरणने धरणगावची वीज शहरात आणून ती संबंधित व्यावसायिकांना पुरवण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी महावितरणने 40 लाख रुपयांचा खर्चही उचलला असून त्यातून या दोन वीज कंपन्यांमध्येच शीतयुद्ध सुरू झाले आहे.
नोव्हेंबर 2011 पासून जळगाव शहर आणि तालुक्यातील वीज वितरण आणि बिल वसुलीची जबाबदारी क्रॉम्प्टन कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या भागातील वीजगळती आणि चोरी वाढल्यामुळे हे घोंगडं महावितरणने क्रॉम्प्टनच्या गळय़ात घातलं आहे. क्रॉम्प्टनने वीजबिल वसुलीसाठी कठोर धोरण आखून वसुली वाढविण्याचे प्रयत्नही चालवले असून त्यात खोडा घालण्याचा प्रकार महावितरणने खान्देश कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून केल्याची क्रॉम्प्टनची भावना आहे. ग्रामीण भागातील वीज आणल्याचे सांगत शहरातील मोठे बकरे महावितरणने कापायचे आणि गरिबांना वीज पुरवण्याची जबाबदारी मात्र क्रॉम्प्टनने उचलायची, अशी स्थिती झाली आहे.
खान्देश सेंट्रलला वीज पुरवण्यासाठी स्वतंत्र फीडर बसविण्यात येत असून त्यासाठी नव्याने खांब उभारण्याचे कामही सुरू आहे. या कामासाठी जळगाव महापालिकेची परवानगी देखील घेण्यात आलेली नाही, असे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, खान्देश सेंट्रलसाठी फीडरच्या उभारणीनंतर या उच्च दाबामुळे होणारा परिणाम, सुरक्षितता, गुणवत्ता वा अपघात याबाबतची कुठलीही जबाबदारी घेण्यास क्रॉम्प्टनने स्पष्ट नकार दिला आहे.
महावितरणचा हस्तक्षेप अमान्य
महावितरणने खान्देश सेंट्रलला उच्च दाबाची सुविधा देण्यासंबंधी क्रिसेंट टुरिझम अँण्ड एंटरटेन्टमेंट कंपनीशी करार केला होता. त्यानंतर क्रिसेंट कंपनी बंद होऊन जळगाव एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (जेईपीएल) नावाच्या कंपनीशी महावितरणने करार केला. हा करार क्रॉम्प्टनने सूत्रे हाती घेतल्यानंतर 30 एप्रिल 2012 ला संपला. तोपर्यंत खान्देश सेंट्रलमधील 28 वीज जुळण्यांची थकबाकी सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. तिच्या वसुलीसाठी क्रॉम्प्टनने तिथली वीजजुळणी कापली आहे. त्यामुळे तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून खान्देश सेंट्रलला विद्युत जनित्रावरून वीजपुरवठा सुरू आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट
मोठी थकबाकी थकल्यानंतर क्रॉम्प्टनने वीजजुळणी तोडली. त्यानंतर कराराप्रमाणे वीज मिळावी यासाठी जेईपीएलने क्रॉम्प्टनविरोधात न्यायालयात दावा दाखल केला; मात्र जेईपीएलने हा करार क्रॉम्प्टनशी केला नसल्याने वीज पुरवणे बंधनकारक नसल्याचे सांगून कंपनीने वीज देण्यास नकार दिला आहे. तसेच जेईपीएलने थकबाकी भरून आपल्या कंपनीकडे अर्ज करून वीज मागावी, असेही क्रॉम्प्टनने सूचित केले होते; मात्र संबंधितांनी क्रॉम्प्टनकडे अर्ज केलाच नाही. दुसरीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही महावितरणच्या अधिकार्‍यांनी थेट धरणगावहून वीज आणून स्वतंत्र जुळणी देण्याचा घाट घातला आहे.
आम्ही वीज देण्यास तयार
खासगीकरणानंतर शहराला वीजपुरवठा करण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्याकडे मागणी केल्यास ती पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. नोडल म्हणून कार्यरत असलो तरी आमच्या क्षेत्रात महावितरणने हस्तक्षेप करून ग्राहकांना वीज देणे योग्य नाही. याविषयी महावितरण कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. तसेच फीडरच्या उभारणीनंतर होणार्‍या परिणामांची व सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेणार नाहीत. डॉ. व्ही.पी. सोनवणे, युनिट हेड
हा तर आमचा अधिकार
महावितरण कंपनीने क्रॉम्प्टनला ही फ्रॅँचाइजी दिली आहे. त्यामुळे त्यावर आमचा अधिक अधिकार आहे. महावितरणने करार केला होता; तो पूर्ण करीत आहोत. तसेच याविषयीचा वाद न्यायप्रविष्ट असून, अजून निकाल लागायचा बाकी आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. याविषयी नंतर बोलू. अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता महावितरण
काम नियमानुसारच सुरू
फीडरचे काम नियमाला धरूनच आहे. त्यात कुठलेही नियमबाहय़ काम नाही. वीज मंडळाकडून तशी परवानगी घेतली आहे. त्यामुळे क्रॉम्प्टनने विरोध करण्याचा प्रश्नच नाही. फ्रॅँचाइजी घेण्यापूर्वी ही मिनी फ्रॅँचाइजी घेणेही आवश्यक होते; ती त्यांनी घेतली नाही. वीज तालुक्याबाहेरून आणली आहे. त्यामुळे त्यावर ह्या कंपनीचा हक्क नाही. एस.एम. सदामते, नोडल ऑफीसर, महावितरण
फक्त आमची मागणी पूर्ण व्हावी
आमच्या गरजेनुसार आम्ही विजेची मागणी केली आहे. ती संबंधित विभागाला कळवली आहे. त्यावर ती वीज कोणी, कशी द्यायची? यावर निर्णय घेणे त्यांची जबाबदारी आहे. महावितरण व क्रॉम्प्टन यांनी मागणीनुसार वीज पुरवली पाहिजे. त्यांच्यात काय सुरू आहे, याच्याशी आमचे घेणे-देणे नाही. कोणीही काम पूर्ण करून द्यावे. आमच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. आशिष जैन, खान्देश सेंट्रल