आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाच्या चटक्यांसोबत विजेची मागणी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याबरोबर विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. राज्याची विजेची मागणी सोमवारी प्रथमच थेट 15 हजार 73 मेगावॅटवर पोहोचली. राज्यात महाजनको आणि सेंट्रल सेक्टर ग्रीडमधून केवळ 14 हजार 217 मेगावॅट वीजनिर्मिती झाल्याने तब्बल 856 मेगावॅटचा वर्षातील सर्वात मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मंगळवारी मात्र विजेची मागणी 13 हजार 971 मेगावॅट नोंदवण्यात आली.

परळीचे वीजनिर्मिती संच पाण्याअभावी बंद पडल्यानंतर तब्बल 800 मेगावॅट विजेपासून राज्याला पारखे व्हावे लागले. विस्तारित वीजनिर्मिती प्रकल्पातूनही पुरेशा प्रमाणात वीज मिळत नसल्याने यंदा विजेची मागणी अभूतपूर्व वाढण्याची चिन्हे आहेत. सोमवारी राज्याची वीज मागणी 15 हजार 73 मेगावॅटवर पोहोचली होती. यामुळे सेंट्रल सेक्टरमधून वीज खरेदी केल्यावरही 856 मेगावॅटची तूट निर्माण झाली. मे महिन्यात या तुटीत अजून वाढ शक्य आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दीपनगर (भुसावळ) औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन्ही विस्तारित संचांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती झाल्यास ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. वीज गळती अधिक असलेल्या भागातही सोमवारीही वीजपुरवठा सुरू असल्याने विजेची मागणी वाढल्याचे मत महावितरण कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केले. मात्र उन्हाळ्याचा कालावधी आणि सलग सुट्यांमुळे बुधवारी औद्योगिक वापर वाढल्याने ही तूट निर्माण झाली होती. मे महिन्यात विजेची मागणी 16 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.