आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्‍ये वीजदाब वाढल्याने उपकरणे खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरात गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या मुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पावसामुळे म्हाडा कॉलनीतील ट्रान्सफॉर्मरमधून जास्त दाबाने वीजपुरवठा झाल्याने 200 घरांतील विजेवरील लहानमोठी उपकरणे जळाली. नुकसानीची तीव्रता वाढण्यापूर्वीच नागरिकांनी स्थानिक लाइनमनच्या मदतीने वीजपुरवठा बंद केला. सकाळी शहरातील डी. एस. हायस्कूल कार्यालयातील कर्मचार्‍यांनी ट्रान्सफॉर्मरवरील वीजदाब तपासला. तो अधिक असल्याने तांत्रिक बिघाड दूर करून दुपारी 12 वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

वीजदाब वाढल्यामुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांचे टीव्ही, फ्रीज, सीएफएल, पंखे, इन्र्व्हटर आदी उपकरणे जळून नष्ट झाली. संपूर्ण म्हाडा कॉलनीत वीज तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असून हाताच्या अंतरापर्यंत पोहोचल्या आहेत. याच स्थितीत बेमोसमी पावसामुळे वीज तारांमधील बिघाड थेट ट्रान्सफॉर्मरपर्यंत पोहोचून दाब वाढल्याचा अंदाज आहे.

फ्यूज, डीओ निकामी
वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरवर डीओ बसवलेले असतात. वीज कंपनीने ग्राहकांच्या घरातही फ्यूज (वितळतार) बसवलेला असतो. मात्र, ट्रान्सफॉर्मरवरील डीओ निकामी असल्याने दाब वाढूनही ते तुटले नाहीत. तारांवर असलेल्या झाडांच्या फांद्या आणि वेली उन्हाळ्यात काढण्यात आल्या नाहीत. या मुळे म्हाडा कॉलनीतील वीज उपकरणांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नुकसानीला वीज कंपनीच जबाबदार
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात वीज नियामक आयोगाकडे तक्रार केली आहे. कंपनीमुळे झालेले नुकसान वसूल करू. ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान होत असेल तर नियमांनुसार जबाबदारी वीज कंपनीची आहे. शाम वलकार, म्हाडा कॉलनी, भुसावळ

पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज
शहरातील म्हाडा कॉलनीत वीजदाब का वाढला? याची कारणे शोधण्यासाठी चौकशी होईल. वीज ग्राहकांचे मिळालेले निवेदन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवून त्यांना नुकसान भरपाई देता येईल का? यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. बेमोसमी पावसामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एन. डी. नारायणे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, भुसावळ

ग्राहकांनी दिले निवेदन
म्हाडा कॉलनी आणि आयोध्या नगरातील रहिवाशांनी शुक्रवारी कार्यकारी अभियंता एन.डी.नारायणे यांना निवेदन दिले. वीज वितरण कंपनीच्या गाफीलपणामुळे वीज उपकरणांचे नुकसान झाल्याने भरपाई द्यावी, अशी मागणी केली. नगरसेवक युवराज लोणारी आणि भीमराज कोळी यांनी अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे निवेदन पाठवण्यात आले. उत्तम कोळी, विनोद रजाने, विलास सोनवणे, विलास ठोके, धनराज बाविस्कर आदी उपस्थित होते.

असे झाले नुकसान
वीजदाब वाढल्याने म्हाडा आणि आयोध्या नगरातील नागरिकांचे 22 टीव्ही, 16 फ्रीज, 32 पंखे, 37 ट्यूब लाइट आणि 198 सीएफएल दिव्यांमधून धूर निघाले. दाब वाढल्याने वीज प्रवाह सुरू असलेले दिवे टाक्यांसारखे फुटले. शुक्रवारी सकाळीदेखील वीज प्रवाह सुरू करण्यापूर्वी ट्रान्सफॉर्मरमधील एलओ लाइनवर 285, ब्लूवर 245 आणि रेड लाइनवर 227 व्हॅट वीज प्रवाह असल्याचे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन
शहरातील म्हाडा कॉलनी, आयोध्यानगर आदी भागातील नागरिकांना वीज वितरण कंपनीमुळे आर्थिक झटका बसला. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेदरम्यान बेमोसमी पावसामुळे 114 क्रमांकाच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीजदाब वाढल्याने किमान 200 घरांतील विजेवरील उपकरणांचे नुकसान झाले. रात्री खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी 12 वाजेनंतर सुरळीत झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.