आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड; २५ तासांनंतर वीज पुरवठा पूर्ववत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रल्हादनगरातील ट्रान्सफाॅर्मरचा लाेड वाढल्याने वीजपुरवठा बुधवारी दुपारी वाजता खंडित झाला हाेता. दाेन ते तीन तासांत पूर्ववत वीजपुरवठा हाेईल, असे सातत्याने वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत हाेते.

प्रत्यक्षात मात्र उपाययाेजना संध्याकाळी वाजेपासून करण्याच्या कामाला सुरुवात झाली. साधारणत: मध्यरात्रीपर्यंत हे काम करण्यात आले. मात्र, पुन्हा वीजपुरवठा सुरू हाेताच ट्रान्सफाॅर्मरची केबल जळाली. त्यामुळे या भागातील नागरिकांना संपूर्ण रात्र उकाड्यामुळे जागून काढावी लागली. पाणीटंचाईचाही सामना करावा लागला. त्यानंतर गुरुवारी हा ट्रान्सफाॅर्मर सुरू करण्यात आला; पण ताे पुन्हा बंद पडला. दुपार झाली तरी खंडित वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नसल्याने लाेकभावना प्रचंड तीव्र झाल्या. अनेकांनी दूरध्वनीवरून वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तीन दिवसांपासून हा लपंडाव सुरू आहे.

तापी नगर उपकेंद्राची पाहणी
वीजकंपनीचे पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. साळुंके यांनी गुरुवारी येथील तापीनगर भागात सुरू असलेल्या वीज उपकेंद्राच्या कामाची पाहणी केली. ए. व्ही. शिंदे, कार्यकारी अभियंता एन. डी. नारायणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. पी. वानखेडे, सहायक अभियंता बी. एन. साेनवणे, पायाभूत आराखडा सहायक अभियंता ए. एफ. कुशवाह उपस्थित हाेते.

खंडित वीजपुरवठा २५ तासांपर्यंत सुरळीत हाेत नसल्याचा प्रकार म्हणजे वीज वितरण कंपनीने गाठलेला बेफिकिरीचा कळसाध्याय आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कार्यालयाच्या दूरध्वनीवर तक्रारी करण्याचा प्रयत्न केला, तर ते दूरध्वनीच उचलत नाहीत. त्यामुळे संतापात भर पडत असते. अभयकुळकर्णी, नागरिक, प्रल्हादनगर

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. ट्रान्सफाॅर्मरवर लाेड वाढला की, बिघाडाचे प्रकार घडतात. नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवून प्रल्हादनगर भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक अडचणींवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सुरळीत सेवेवर भर दिला आहे. एस.पी. वानखेडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता

- सुमारे एक ते दीड हजार लाेकसंख्या असलेल्या प्रल्हादनगर भागातील नागरिकांना गेल्या दाेन महिन्यांपासून खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. बुधवारी गुरुवारी तर या समस्येने कळस गाठल्याचा अनुभव वीज ग्राहकांना आला.

- नेहमीपेक्षा दीडपटीने विजेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी, फ्रीज, पंख्यांचा वापर जास्त असल्याने लाेड वाढताे. परिणामी ट्रान्सफाॅर्मरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण हाेण्याच्या घटना घडतात; पण उपाययाेजना प्रभावशाली नाहीत.

- काही ठिकाणी विजेच्या तारा झाडांच्या फांद्यांना स्पर्श करून गेल्या आहेत. वादळ आले म्हणजे वीजपुरवठा खंडित हाेताे. तुरळक पावसाच्या सरी काेसळल्या तरी या समस्येचा सामना करावा लागताे.

- वाढत्या तापमानामुळे राेहित्रांना आगी लागल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात तीन ठिकाणी राेहीत्रांच्या केबल जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले आले. परिणामी आता वीजग्राहकांचा राेष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.