आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Load Shading Followup In Dainik Divya Marathi Bhusawal,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’नेच लावून धरला भारनियमनाचा विषय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: वीज बिलाची शंभर टक्के वसुली आणि वीज गळतीचे प्रमाण कमी असतानाही शहरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून दररोज सायंकाळी सात ते दहा वाजेच्या दरम्यान भारनियमन सुरू आहे. वीज वितरण कंपनीने रात्रीचे हे जाचक भारनियमन बंद करावे, यासाठी ‘दिव्य मराठी’ने सडेतोड वृत्त प्रकाशित करून हा विषय लावून धरला. आमदार संजय सावकारे यांनीही थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे आता रात्रीचे भारनियमन बंद होणार असल्याने शहरवासीयांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.
वीज वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळात विजेची हानी तब्बल 22 टक्के आहे. त्यातल्या त्यात भुसावळात हे प्रमाण 22 टक्के आहे. वीज वितरण कंपनीने राज्यभरात महाराष्ट्र दिनापासून वीज कंपनीच्या विभागानुसार होणारी वीज वसुली आणि वीज वितरणातील हानी यांच्या निकषावर ग्रुप तयार केले गेले. त्यानुसार भारनियमनाचे टप्पे आखले गेले. नवीन ग्रुपनुसार भुसावळ शहर आधीच्या डी झोनमधून ई झोनमध्ये समाविष्ट झाले. परिणामी शहरवासीयांना दोन टप्प्यात होणार्‍या सहा तासांच्या जाचक भारनियमनाला सामोरे जावे लागले. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आकोड्यांचे जंजाळ भेदले पाहिजे, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी वीज वितरण कंपनीवर दबाव आणण्यासाठी कृतीशिल पाऊल उचलेले पाहिजे, यासाठी ‘दिव्य मराठी’ने मुद्देसुदपणे वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. ‘रात्रीचे भारनियमन बंद करण्याचा विषय मार्गी लागण्यास राजकीय अनास्थाच जबाबदार’, ‘राजकीय पक्षांच्या आंदोलनाचा बार फुसका’ अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधींसह वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांवरही शाब्दिक आसूड ओढले. त्यानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांनीही थेट ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे शहर संपूर्ण भारनियमनमुक्तीसाठी पाठपुरावा केला. मात्र, वीज गळतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यात त्यांचा नाईलाज झाला; पण ऐवढय़ावरच ते थांबले नाहीत तर किमान रात्रीचे भारनियमन तरी बंद व्हावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्याचेच फळ म्हणून आता रात्रीचे भारनियमन बंद होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शुक्रवारी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव घालून आक्रमक भूमिका घेतल्याने रात्रीच्या भारनियमनाचा विषय ऐरणीवर आला होता. आमदार सावकारेंचा अविरत पाठपुरावा, मनसेचे आंदोलन, जनतेच्या मनात खदखदणारी असंतोषाची भावना लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी आता मंगळवारपासून रात्रीचे भारनियमन बंद होणार असल्याचे जाहीर तर केले आहेच; पण ‘लबाडा घरचे आवतन जेवाल तेव्हा खरं’ या म्हणीचा प्रत्यय दुर्दैवाने येऊ नये, अशीच शहरवासीयांची अपेक्षा आहे. संपूर्ण भारनियमनमुक्तीचा विषय मात्र अद्यापही अधांतरी आहे.