आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजभारनियमनाचा त्रास थांबता थांबेना; व्यावसायिक झाले त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील एक्स्प्रेस-2 आणि शिवाजीनगर या दोन फिडरवर भर पावसाळय़ातही भारनियमन सुरू आहे. गणेशोत्सवात काही अंशी भारनियमन बंद केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गणेशोत्सव संपताच भारनियमन आणि सतत खंडित वीजपुरवठय़ाने डोकेदुखी वाढली आहे.

तालुक्यातील दीपनगर औष्णिक केंद्रातून राज्याला दररोज 800 ते एक हजार मेगावॉट वीज पुरवली जाते. मात्र, तरीदेखील शहरात विजेची बोंबाबोंब आहे. वीज वितरण कंपनीच्या थकीत बिल आणि गळतीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपनुसार भारनियमन केले जाते. यापूर्वी शहरातील केवळ शिवाजीनगर फिडरवर गळती अधिक असल्याने भारनियमन केले जात होते. गळती कमी होऊन संपूर्ण शहरच भारनियमन मुक्त होईल, अशा वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र, वीज वितरण कंपनीच्या पायलट प्रोजेक्टमुळे शहरातील वीज बिलांची थकबाकी वाढून एक्स्प्रेस-2 या फिडरवर गळतीचे प्रमाण वाढले. या मुळे शहरातील एक फिडरवरील भारनियमन बंद होणे तर दूरच पण दोन फिडरवर भारनियमन सुरू झाले.

रमजान महिना आणि गणेशोत्सवात नागरिकांना भारनियमनापासून काहीसा दिलासा मिळाला. सध्या मात्र ऐन पावसाळय़ातही दररोज सहा ते साडेआठ तास भारनियमन सुरू आहे. विजेची मागणी कमी असताना शहरात भारनियमन का केले जाते? असा प्रश्न या मुळे उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भारनियमन कमी होणे तर दूरच मात्र त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. वीज वितरण कंपनीने वीज गळती कमी करण्यासाठी शहरातील सर्वच भागात आयआर मीटर बसवण्याचे प्रयत्न केले. मात्र, हा प्रकल्पही संथगतीने राबवला जात असल्याने वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे.