आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीजनिर्मितीत घट; पावसामुळे उष्मांकावर परिणाम, दुरूस्ती होऊनही लाइटअप होईना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- टर्बाइन व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने दीपनगरातील संच क्रमांक तीन बंद होता. बिघाड तीन दिवसांपूर्वीच दुरूस्त झाल्यावरही हा संच अजून लाइटअप झालेला नाही. या मागील कारणांचा शोध घेतला असता फरनेस ऑइलची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आधीच निकृष्ट आणि त्यातही पावसामुळे ओल्या होणार्‍या कोळशामुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी चंद्रपूरमध्ये पुराने थैमान घातल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला होता. तर उन्हाळ्यात पाण्याअभावी बंद असलेल्या परळीमधूनही समाधानकारक वीजनिर्मिती झालेली नाही. तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या भुसावळातील दोन विस्तारित संचांपैकी केवळ एका संचातून व्यावसायिक वीजनिर्मिती होते. जेमतेम वर्षभरही न चाललेल्या या संचात बिघाडांची मालिका कायम आहे. संच पाचची सीओडी अजून झालेली नाही. परिणामी दीपनगरमध्ये चार संच असले तरी वीजनिर्मितीची खरी मदार जुन्या प्रकल्पातील संच दोन आणि तीनवर अवलंबून आहे. मात्र, गेल्या आठवड्यात संच तीनच्या टर्बाइन व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला होता. हा बिघाड तीन दिवसांपूर्वीच दुरूस्त झाल्याने संच लाइटअप होणे अपेक्षित होते. मात्र, ओल्या कोळशाचा उष्मांक कमी असल्याने संच लाइटअप करण्यासाठी अगोदर फरनेस ऑइलचा वापर होतो. या ऑइलची कमतरता असल्याने संच तीनमधून वीजनिर्मिती होत नाही.

दीपनगरातून 324 मेगावॉट निर्मिती
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राज्याला सोमवारी 324 मेगावॉट वीज मिळाली. संच दोनमधून 134 तर संच चारमधून 190 मेगावॉट अशी ही आकडेवारी होती. संच तीन आणि पाच मात्र बंद होता. चारही संचाची क्षमता 1420 असली तरी प्रत्यक्ष निर्मिती मात्र 234 मेगावॉट झाली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही स्थिती होती.

चंद्रपूरची राज्यातील आघाडी कायम
चंद्रपूर केंद्रातील सातपैकी संच एक, दोन आणि पाच बंद होता. उर्वरित संच क्रमांक तीनमधून 100, चार 115, सहा 258 तर संच सातमधून 264 मेगावॉट वीजनिर्मिती झाली. सोमवारी चंद्रपूर केंद्राने राज्याला सर्वाधिक 737 मेगावॉट वीजपुरवठा केला.