आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चभ्रू वसाहतींमध्ये वीजचोरीचे प्रमाण वाढले; नऊ जणांवर गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचे उघड झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी वीजचोरी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत एक हजार २०० वीज ग्राहकांच्या वीज वापराची अॅक्विचेक यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९० जणांनी ३० लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध विशेष पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये झोपडपट्टीतील नागरिकांपेक्षा उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या डॉक्टर, वकील, शिक्षक आदींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
शहरातील झोपडपट्टी भागात वीजवाहिन्यांवर आकडा टाकून वीजचोरी करण्याचे प्रकार वाढले आहे. त्याचबरोबर उच्चभ्रू वसाहतीमध्येही अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वीजचोरी केली जात आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वीजचोरांना पकडणे अवघड होते. या पार्श्वभूमीवर वीज कंपनीने वीज चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना केली अाहे. या पथकांनी पंधरा दिवस शहरातील तुळशीराम नगर, पारोळा रोड, पंचवटी, एमआयडीसी, लालबाग, रामवाडी, वडजाई रोड, देवपूर या परिसरातील एक हजार २०० वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. मीटर तपासण्यासाठी अॅक्विचेक यंत्राचा वापर करण्यात आला. तपासणीत ९० वीज ग्राहकांचे मीटर धिम्यागतीने फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित रोज पन्नास टक्के वीजचोरी करत असल्याचे उघड झाले. पंधरा दिवसांत या ९० जणांनी तीन लाख ५० हजार युनिट वीज चोरून वापरली. त्यामुळे वीज कंपनीला तब्बल ३० लाख ३० हजार रुपयांची महसुली तूट सहन करावी लागणार होती. वीज चोरट्यांकडून तडजोडीअंती २० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ज्यांनी वीजचोरीची रक्कम भरण्यास मज्जाव केला आहे. त्या ग्राहकांविरुद्ध नाशिक येथील वीज कंपनीच्या विशेष पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत नऊ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून अद्ययावत यंत्राचा वापर करून वीजचोरी पकडण्यासाठी शहरात प्रथमच मोहीम राबवण्यात आली.

वीजचोरीच्या क्लृप्त्या
वीजचोरी करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरण्यात येत असल्याचे मोहिमेत आढळले. त्यात रिमोटच्या साहाय्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटरमध्ये एक्स-रे फिल्मचा वापर करणे, चुंबकचा वापर करून मीटरचा वेग कमी करणे, मीटर बंद करणे, आकडा टाकणे आदी प्रकारांचा समावेश असल्याची माहिती वीज कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

व्यापारी, शिक्षक, डॉक्टरही आहेत चोर
झोपडपट्टीतील नागरिकच वीजचोरी करतात, असा आरोप नेहमी होतो; परंतु विशेष मोहिमेत व्यावसायिक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, राजकीय पुढारीही वीजचोरी करत असल्याचे आढळले आहे. चोरी पकडल्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने संबंधितांनी तडजोडीची रक्कम भरली आहे.

विशेष मोहीम नेहमीच
^वीजचोरी करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरण्यात येत आहे. चोरी करणाऱ्यांकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. आगामी कालावधीतही चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. कुणीही वीजचोरी करू नये. वीज चोरट्यांना पकडण्यासाठी शहरात यापुढेही कायमस्वरूपी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. -के.डी. पावरा, कार्यकारी अभियंता, वीज कंपनी

बातम्या आणखी आहेत...