आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात वीजचोरी सुरुच; वितरण कंपनीचेही होतेय दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहर संपूर्ण भारनियमनमुक्त करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या पाठपुराव्याने मंगळवारपासून रात्रीचे भारनियमन बंद होणार आहे. दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षाने शहरात वीजचोरीचे सत्र सुरुच आहे.
भारनियमन बंद होण्यासाठी आमदार सावकारे यांनी थेट ऊर्जामंत्र्यांना भेटून प्रयत्न केले. मात्र, वीज गळती 39 टक्के असल्याने संपूर्ण भारनियमनमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. तरीही शहरातील रात्रीचे भारनियमन बंद करण्यात त्यांना यश आले. संपूर्ण भारनियमन मुक्ती हवी असेल तर वीज गळती आणि वीजचोरी थांबविण्याशिवाय पर्याय नाही. ही जबाबदारी सर्वार्थाने वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांची आहे. शहरात मात्र असे होताना दिसत नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीजचोरी थांबविण्यासाठी क्रियाशील नसल्याने फुकटात वीज वापरणार्‍यांचे फावले आहे. शहरातील खडका रोड, मुस्लिम कॉलनी, पंचशिलनगर, लकीभाननगर, पापानगर येथे वीजतारांवर आकोडे टाकून तर उच्चभ्रूंची वस्ती समजल्या जाणार्‍या शांतीनगर, प्रोफेसर कॉलनी, नाहाटा कॉलेज परिसरातही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत आहे. वीजचोरी रोखण्यासाठी सर्व कनिष्ठ अभियंत्यांना उद्दिष्ठ देण्यात आले आहे. मात्र, असे असूनही चोरी का थांबत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
आकड्यांनाही बटण - शहरातील लकीभानगरात वीज चोरांनी कहर केला आहे. या भागात कारवाई होत नसल्याने आकड्यांच्या केबलला थेट स्वीच (बटण) बसविण्यात आले. म्हणजे दररोज आकडे काढून घेण्याचाही त्रास नाही. कंपनीच्या अधिकार्‍यांना त्याचे कोणतेही सोयरेसुतक नाही. या दुर्लक्षामुळे वीजचोरीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.
वीजचोरी रोखणारच - वीजचोरी रोखण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांसह कर्मचार्‍यांनाही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 11 वीज चोर्‍या उघडकीस आल्या होत्या. आता वीजचोरांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात येतील. ग्राहकांनी वीजचोरी थांबविण्यासाठी सहकार्य करावे. यामुळे संपूर्ण भुसावळ शहरात भारनियमनमुक्ती शक्य होऊ शकते. मनोज त्र्यंबके, कार्यकारी अभियंता, भुसावळ