आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम; महिनाभरात चार ठिकाणी कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - वीजचोरी करून विजेचा अवैधपणे वापर करणार्‍या वीज चोरट्यांविरुद्ध वीज वितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत आता भुसावळ शहर आणि विभागातही कारवाई होणार आहे. यामुळे 35 टक्क्यांपर्यंत गळती असलेल्या भुसावळ शहरात गळती कमी होऊन शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
हिवाळ्यात भारनियमनमुक्त असलेल्या भुसावळ शहराची गळती 30 टक्क्यांच्या आत होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात मात्र वीज गळती 35 टक्क्यांपर्यंत वाढली. यामुळे सर्वच फीडरवर भारनियमन होत आहे. आता पावसाळ्यात ही गळती वाढू नये, यासाठी वीज वितरण कंपनीने धडक मोहीम राबवण्याचा विचार केला आहे. जळगाव परिमंडळात तपासणी पथक अचानक संशयित ग्राहकांसह वीजचोरांवर कारवाई करत आहे. भुसावळ शहराकडेही हा मोर्चा वळणार आहे. अधिक वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या मीटरची नोंद घेऊन तपासणी करणे, वीजचोरी आणि गळती थांबवण्यासाठी वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. वीज कंपनीच्या या धडक मोहिमेत सिंगल, थ्री फे जवरील वीजपुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक अशा ग्राहकांची वीज जोडणी तपासली जाईल. दोषी आढळून आलेल्या ग्राहकांवर विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व कलम 126 नुसार कारवाई होणार आहे.
अशी थांबणार वीज गळती
वीज वितरण कंपनीने शहरातील वीज गळती आणि हानी थांबवण्यासाठी प्रथम जुने वीज उपकरणे बदलणे आवश्यक आहे. आरएपीडीआरपी योजनेतून निधी उपलब्ध असतानाही भूमिगत वीजवाहिनी, ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीजतारा आणि खांब रिपलेस करणे आदी कामे रखडली आहेत. कारवाई सोबतच याकडेही लक्ष्य दिलास यश मिळेल.

आयआर मीटर असणे गरजेचे
भुसावळ शहरातील वीज गळती थांबवण्यासाठी आयआर अर्थात इन्फ्रारेड वीजमीटर बसवण्यात येणार होते. 40 हजार ग्राहकांपैकी केवळ 12 हजार 500 ग्राहकांकडे मीटर बसवण्यात आले. उर्वरित ग्राहकांकडे अजूनही जुन्या पद्धतीचे मीटर आहे. यामुळे छेडछाड करून रीडिंग कमी केले जाते. आयआर मीटरमुळे हे प्रकार थांबून शहरातील ग्राहकांना दिलासा मिळेल.
भुसावळ विभागात कारवाई
जळगाव परिमंडळातील भुसावळ आणि सावदा वीज उपविभागातही गेल्या महिनाभरात चार ठिकाणी कारवाई झाली. यात प्रल्हाद तुकाराम बगाडे (रा. फुलगाव) यांच्याकडून 20 हजार 460 रुपये, सुमन चौधरी (रा. निंभोरा बुद्रूक) यांच्याकडून 20 हजार 232, जनार्दन भिवसेन भालेराव (रा.यावल) यांच्याकडून 36 हजार 279 तर खान शाकिर खान (रा. यावल) यांच्याकडून 28 हजार 727 रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ कार्यालयातून देण्यात आली.

येथे होते वीजचोरी
भुसावळ शहरातील राहुलनगर, पापानगर, काझी प्लॉट, गौसियानगर, पंचशीलनगर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीजचोरी केली जाते. उच्चभ्रू वस्त्यांमध्येही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होते. भरारी पथकाचे प्रमुख एस. के. लोखंडे यांनी गतकाळात असे अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत.

कारवाईचे नियोजन सुरू
४वीज वितरण कंपनीने जळगाव परिमंडळात 62 जणांवर कारवाई केली आहे. दक्षता आणि सुरक्षा विभागाकडून आता भुसावळ शहरातही कारवाई केली जाणार आहे. वीज गळती कमी झाल्यास भुसावळकरांना दिलासा मिळेल. कारवाईबाबत सुयोग्य नियोजन झाले असून कारवाई होणार आहे.
अविनाश साखरे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, जळगाव परिमंडळ