आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यानात विजेची सर्रास उधळपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - एकाच बागेत तब्बल 40 दिवे लावण्याची करामत महापालिकेने केली. हे सर्व दिवे एकाच ठिकाणी प्रकाश देतात. त्यातून विजेची उधळपट्टी होत आहे. शहरात एकीकडे रस्त्यांवर पथदिवे नाहीत. तर दुसरीकडे एकाच ठिकाणी दिवाळी साजरी केली जात असल्याचा प्रत्यय शहरातील देवपूर परिसरात येत आहे.

शहरात सर्व भागात पथदिवे बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या सुमारास नागरिकांची सोय व्हावी, यासाठी ही सुविधा असते. रस्त्यावरील पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होते. मात्र, सुविधेऐवजी एकाच ठिकाणी तीस ते चाळीस पथदिवे लावणे ही केवळ उधळपट्टीच ठरू शकते, असे दृश्य दत्त मंदिराजवळील मोकळया जागेवर असलेल्या बगिच्यात पाहायला मिळते.

शहरातील सर्वच भागात आणि विशेषत: कॉलनी परिसरात पथदिवे असणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही बर्‍याच ठिकाणी पथदिवे नादुरुस्त आहेत. तर काही ठिकाणी नवीन पथदिवे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात चौकाचौकांत हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. त्यानंतर कॉलनी भागातील चौक, मोकळया मैदानात हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. शहरात साधारणपणे 12 हजार पथदिवे लावण्यात आले आहेत. या पथदिव्यांतही विविध प्रकार आहेत. त्यात ट्यूबलाइट, मक्र्युरी, सोडियम व्हेपर, सीएफएल, मेटल हेडलाइट प्रकारातील कमी-जास्त क्षमतेचे दिवे लावले आहेत. त्यामुळे या पथदिव्यांच्या वापराचे युनिटही कमी-जास्त आहे. शहरात काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. तर काही कॉलनी भागात हायमास्ट तसेच मोकळया जागेतील बगिच्यात एक, दोन नव्हे तर साधारणपणे चाळीस दिवे लावण्यात आले आहेत. देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकापासून काही अंतरावरील मोकळया जागेतील संत गाडगेबाबा उद्यानाच्या चारही बाजूने असे दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघत आहे. मात्र, एकाच ठिकाणी सरासरी 150 व्ॉटचा एक दिवा याप्रमाणे सहा हजार व्ॉटचे 40 दिवे तेवत आहेत.

रात्रभर म्हणजे साधारणपणे आठ ते दहा तास हे दिवे सुरू असतात. एका दिव्याला एका रात्रीसाठी दीड युनिट वीज खर्च होते. अशा प्रकारे एका पथदिव्याला महिनाभरात 45 युनिट वीज खर्च होते. त्याचे 225 रुपये वीजबिल येते. या पद्धतीने दहा पथदिव्यांसाठी 450 युनिट आणि दोन हजार 250 रुपये वीजबिल येते. तर 40 पथदिव्यांसाठी 1800 युनिट खर्च होऊन नऊ हजार रुपये वीजबिल भरावे लागते. याप्रकारे दर महिन्याला हजारो रुपयांचे वीजबिल या एकाच ठिकाणी असलेल्या दिव्यांसाठी द्यावे लागत आहेत. या प्रकाराकडे महापालिकेच्या लाइट विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसत आहे. एकाच ठिकाणी इतके दिवे प्रकाशित करण्याचे कारण काय, याचे उत्तर मात्र अधिकार्‍यांकडे नाही.