आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआयसीचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी कामगार सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या हद्दीत खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य विमा निगम अर्थात ईएसआयसीअंतर्गत आरोग्याच्या सुविधा देण्यात येतात. ईएसआयसीच्या दवाखान्यातून फक्त बाह्यरुग्ण सेवा देण्यात येते. गंभीर आजार, शस्त्रक्रियेसाठी ईएसआयसीतर्फे रुग्णांना नाशिक येथील रुग्णालयात पाठवण्यात येते. हे अंतर लांब असल्याने धुळे शहरात ईएसआयसीचे स्वतंत्र रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या कर्मचारी राज्य विमा निगमतर्फे कामगारांना आरोग्य संरक्षण देण्यात आले आहे. त्याअंतर्गत कामगारांची खासगी आस्थापनेकडून नोंदणी करण्यात येते. त्यानंतर त्यांना एक क्रमांक देण्यात येतो. खासगी क्षेत्रातील कामगारांना अारोग्याच्या समस्या उद‌्भवल्यास त्यांची ईएसआयसीच्या दवाखान्यात अारोग्य तपासणी करण्यात येते. त्या ठिकाणी माेफत औषधोपचार करण्यात येतो. शहरात स्टेशन रोडवर ईएसआयसीचा दवाखाना आहे. महापालिका हद्दीत असलेल्या चार हजार कामगारांची ईएसआयसीकडे नोंद करण्यात आली आहे. मात्र, ईएसआयसीच्या दवाखान्यात केवळ बाह्यरुग्ण सेवा देण्यात येते. या ठिकाणी रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा नाही.

गंभीर आजार, शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील ईएसआयसीच्या रुग्णालयात पाठवण्यात येते. त्यात धुळे, जळगाव नंदुरबारमधील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात ईएसआयसीचे स्वत:चे रुग्णालय होणे आवश्यक अाहे. धुळे शहर मुंबई-आग्रा सुरत-नागपूर या दोन महामार्गांवर आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहे. महामार्गाला लागूनच औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतील अनेकांना ईएसआयसी लागू आहे. तसेच हे शहर जळगाव नंदुरबारच्या कामगारांना सोयीचे असल्याने शहरात रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांचीही नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कामगारांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. कामगारांच्या वाढत्या संख्येनुसार शहरात रुग्णालय करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मोठ्या दवाखान्यांत उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे शहरात ईएसआयसीचे रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

कामगारांची संख्या १० हजार
ईएसआयसीतर्फे महापालिकेच्या हद्दीतील कामगारांनाच आरोग्याची सुविधा देण्यात येत आहे. भविष्यात जिल्ह्यातील कामगारांचा यात समावेश करावयाचा आहे. त्यासाठी ईएसआयसीतर्फे जिल्ह्यातील कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार साधारणपणे जिल्ह्यात दहा ते बारा हजार कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, यातील सगळ्याच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा नीटपणे मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील.

सध्या दोन खासगी रुग्णालयांची सेवा
ईएसआयसीने शहरातील दोन खासगी हॉस्पिटलशी करार केला आहे. त्यानुसार या हॉस्पिटलमध्येही ईएसआयसी लागू असेलल्या कामगारांना त्यांच्या कुटुंबीयांना सेवा मिळते.

राजकीय इच्छाशक्ती हवी
शहरात ईएसआयसीचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावे. त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, रुग्णालय मंजुरीसाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी खासदार, आमदार राजकीय नेत्यांनी प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील दहा हजार कामगार त्यांचे कुटुंबीय शेजारील दोन्ही जिल्ह्यातील कामगारांना याचा फायदा होणार आहे. त्यासाठी लक्ष घातल्यास हे रुग्णालय होऊ शकते. परंतु कोणीही यात लक्ष घालायला तयार नाही. राजकीय पक्षांनी कधीच या विषयात हात घातला नाही. त्यामुळे विषय प्रलंबीतच आहे.