आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ रोजगार मेळावा; तब्बल 3215 युवकांना नोकरीची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- बुद्धिमत्ता, शिक्षण असूनही केवळ प्रवास भाड्याअभावी नोकरीच्या मुलाखतीपासून वंचित राहणार्‍या युवकांना महाराष्ट्र शासन आधार देणार आहे. मुलाखतीसाठी प्रवास करता यावा, म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना एक विशेष कूपन (व्हाऊचर) देण्याची योजना विचाराधीन असल्याचे रोजगार व स्वयंरोजगार राज्यमंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळातील पहिल्याच रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या माध्यमातून 12 नामांकित कंपन्यांनी 3215 युवकांची नोकरीसाठी प्राथमिक निवड केली. तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त युवकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण संतोषी माता हॉल खच्चून भरला होता.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या मेळाव्यात जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या. पालकमंत्री सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यानंतर शासनाकडून आलेले उद्योजक प्रतिनिधी सूर्यकांत मुळे यांनी, युवक आपला जिल्हा सोडायला तयार नाही. दुसरीकडे अन्य जिल्ह्यात काम जमेल किंवा नाही? अशी भीती त्यांच्या मनात असते. मात्र, स्पर्धेचे युग असल्याने न डगमगता वाटचाल करा, असा सल्ला त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, अप्पर पोलिस अधीक्षक एन. अंबिका, उपअधीक्षक विवेक पानसरे, तहसीलदार वैशाली हिंगे, पंचायत समिती सभापती मंगला झोपे, उपसभापती शेख खलील शेख गनी, गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक युवराज लोणारी, निर्मल कोठारी, विधानसभा क्षेत्रप्रमुख नारायण कोळी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपसंचालक अनिल पवार, सहायक संचालक प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपसंचालक अनिल पवार यांनी मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.
संधी चालत आली
आतापर्यंत आपल्या भागातील युवकांना रोजगारांच्या संधी शोधाव्या लागत होत्या. आता या संधी स्वत: आपल्याकडे चालत आल्या असून युवकांनी ही संधी दवडू नये. मेळाव्याचा उपक्रम अभिनव आहे.
-राजेंद्र चौधरी, गटनेते, पंचायत समिती
या नामांकित कंपन्यांचा होता सहभाग
महेंद्रा हिनोदय, पुणे (348), एल अँड टी कन्स्ट्रक्शन, अहमदाबाद (300), चौधरी टोयाटो, जळगाव (60), जी फोर एस सिक्युरिटी, पुणे (110), धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद (50), टाटा मोटर्स, पुणे (514), व्हिडिओकॉन, औरंगाबाद (455), व्हील्स इंडिया, रांजणगाव (374), फियाय इंडिया, शिरूर (300), मायलॉन लॅबोरेटरिज, सिन्नर (240), पियाजीओ कंपनी (280), शिवशक्ती कंपनी, धुळे (184) निवड झालेल्या 3215 मध्ये 500 युवतींचा समावेश आहे.
प्रतिसाद समाधानकारक
2006 मध्ये पुणे, ठाणे आणि 2009 मध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये विभागीय रोजगार मेळावे घेतले. भुसावळात प्रचंड प्रतिसाद मिळाला. याद्वारे अनेकांना नोकरी मिळणे निश्चित आहे.
-अनिल पवार, उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार
कष्टाशिवाय यश नाही
ध्येयप्राप्ती महत्त्वाची आहे. मात्र, कष्टाशिवाय यश मिळत नाही. युवक, युवतींनी आपल्या आवडीच्या विषयाचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनावे.
-एन. अंबिका, अपर पोलिस अधीक्षक, जळगाव
काय म्हणाले पालकमंत्री
>खासगी एम्प्लॉयमेंटमधून युवकांना नोकरी मिळते. मात्र, सरकारीमधून नाही, हे चित्र बदलू.
>आता एम्प्लॉयमेंट कार्यालयात जाऊन नोंदणीची गरज नाही. ऑनलाइन नाव नोंदणी सुरू.
>एकीकडे बेरोजगारी, तर दुसरीकडे ‘माणसे पाहिजेत’ असा फलक, हा विरोधाभास का?
>तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार करून युवकांनी प्रशिक्षण घेण्याची गरज.
>मनातील न्यूनगंड झटका. वाईट गोष्टीतील पैसा टिकत नाही, र्शमाशिवाय पर्याय नाही.
>दुर्लक्षित झालेल्या रोजगार आणि स्वयंरोजगार योजनेमध्ये काळजीपूर्वक लक्ष घातले आहे. अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देणार.
अरुणभाई गुजराथींचा कानमंत्र
>मेळाव्याला झालेली गर्दी पाहून आनंद वाटला. मात्र, अद्यापही मोठय़ा संख्येने युवक बेरोजगार असल्याचे पाहून दु:खही झाले.
>जपान 2, ऑस्ट्रेलिया 4, इंग्लंड 6, अमेरिका 7 आणि भारतात 11 टक्केबेरोजगारी आहे. विकसनशील देशातही हे चित्र आहे.
>एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तिला नोकरी हवी, असा कायदा करणे काळाची गरज.
>श्रम आणि बुद्धीचा संगम, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पॅटर्न तयार करा, संगणकाशी मैत्री करा.
>युवकांनी स्वत:शी स्पर्धा करावी. फक्त नशिब, नशिब न करता प्रामाणिकपणे कष्टाला प्राधान्य द्यावे, यश हमखास मिळेल.