आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमणधारक झोपले ट्रकसमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सोमवारी सुरू केली. पहिल्याच दिवशी अतिक्रमण विभागाच्या पथकाला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शिवतीर्थ मैदानासमोर वादात फुलविक्रेत्या महिलेने कारवाईला विरोध करत स्वत:सह दीड वर्षाच्या मुलीला ट्रकखाली झोकून दिले. नेहरू चौकातही असाच प्रकार झाला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतु पाेलिस बंदाेबस्तात सुरू झालेल्या कारवाईमुळे चित्रा चाैक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यानचा रस्ता हाॅकर्समुक्त करण्यात यश अाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियाेजन करण्यात अाले अाहे. राष्ट्रीय फेरीवाला समितीच्या बैठकीनंतर महासभेतही वर्दळीच्या रस्त्यावरील हाॅकर्सची ११ ठिकाणी स्थलांतराचा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार मनपाने पर्यायी जागांची निश्चिती केली अाहे. साेमवारी माेहिमेच्या पहिल्याच दिवशी हाॅकर्सकडून विराेध झाला. परंतु मनपा पथकासाेबत पाेलिसांचा ताफा साेबत असल्याने हाॅकर्सचा विराेध मावळला. त्यामुळे सकाळी १० वाजेपासून दुपारपर्यंत रस्ते जेसीबीाने माेकळे करण्यात यश अाले हाेते.

मनपाविरुद्ध न्यायालयात दावा दाखल
महापालिकेने बातमीदारच्या शेजारील बाेळीत फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यास स्थानिक रहिवाशांनी विराेध करत हरकत घेतली. परंतु पालिकेने रहिवाशांची हरकत फेटाळली. त्यामुळे स्थानिक १० रहिवाशांनी जळगाव न्यायालयात महापालिकेविराेधात दावा दाखल केला अाहे. पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला हाेणार अाहे. वादींतर्फे अॅड. के.बी.वर्मा अॅड. जयेश भावसार काम पाहत अाहेत.

अधिकाऱ्यांकडून पाहणी
रेल्वे स्टेशन रस्त्यावरील पर्यायी जागेवर स्थलांतराला स्थानिक नागरिकांनीही विराेध केला अाहे. या नागरिकांनी थेट उपायुक्त प्रदीप जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर रात्री वाजता उपायुक्त, नगरसेवक अनंत जाेशी हाॅकर्सनी रस्त्याची पाहणी केली.

हाॅकर्समध्येच अंतर्गत वाद हाेण्याची भीती
मनपाने गाेलाणी मार्केट तसेच १७ मजलीसमाेरील हाॅकर्सला १७ मजलीच्या शेजारच्या गल्लीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साेमवारी सकाळपासून काही विक्रेत्यांनी गाड्या लावल्या. परंतु यात अनेक चेहरे नवीन असल्याचे हाॅकर्सचे म्हणणे अाहे. त्यामुळे हाॅकर्समध्येच अंतर्गत वाद निर्माण हाेण्याची भीती निर्माण झाली अाहे. ज्या हाॅकर्सची नाेंदणी अथवा नाेटरी अाहे. अशांना अाधी प्राधान्य द्यावे, अशी मागणी हाेत अाहे.

स्थलांतरास रहिवाशांची ना
चित्राचाैक ते शिवाजी महाराज पुतळ्यादरम्यान रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे फळ विक्रेते फूल विक्रेत्यांचे स्थलांतर बातमीदारच्या बाेळीत करण्याचे नियाेजन करण्यात अाले अाहे. परंतु सकाळी या भागातील ५० वर्षांपासून रहिवास असलेल्या स्थानिक नागरिकांकडून त्याला विराेध करण्यात अाला. काही महिला थेट महापालिकेत धडकल्या. तर फळ विक्रेत्यांनी देखील या गल्लीत व्यवसाय करण्यास नकार दिला. त्यामुळे विक्रेते रहिवासी यांच्याविराेधामुळे पथकाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणजे गाेलाणी मार्केटसमाेरील मुख्य रस्त्यावर सकाळपासून हातगाड्या गायब हाेत्या. तर काही गाड्या अतिक्रमणच्या पथकाने जप्त केल्या.

नेहरू चाैकातही गाेंधळ
सायंकाळी ५.३० वाजता कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला नेहरू चाैकातही अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे स्टेशनकडून नेहरू चाैकाकडे येणाऱ्या रस्त्यावर दत्त मंदिराच्या गल्लीत स्थलांतराला हाॅकर्सनी विराेध केला. या वेळी मनपाचे पथक हाॅकर्समध्ये वाद हाेऊन चाैकात अतिक्रमण विभागाच्या वाहनासमाेर बाळू बाविस्कर यांच्यासह काही हाॅकर्स रस्त्यावर झाेपले. त्यामुळे तणाव निर्माण झाला हाेता. या कारवाईत अतिक्रमण विभागाच्या पथकाने काही हातगाड्या खाद्यपदार्थ जप्त केले.

शिवतीर्थजवळील फूल विक्रेत्यांचे अाेटे काढले
दुपारी १२ वाजता शिवतीर्थ मैदानाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या फूल विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. या वेळी अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह सहायक पाेलिस निरीक्षक अशाेक राेही यांच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. दऱम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असल्याने जागा साेडण्यास नकार देत फूल विक्रेत्या मंगलाबाई सपकाळे या महिलेने विराेध केला. प्रशासन एेकत नसल्याने संतापात या महिलेने थेट अापल्या दीड वर्षाच्या मुलीसह ट्रकच्या चाकाखाली झाेकून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप करत त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. या वेळी सपकाळे यांनी थेट माणसांकडे बाेट दाखवत ‘बांगड्या’ भरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी हाेऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. या वेळी महिला पुरुष पाेलिस कर्मचारी बंदाेबस्ताला हाेते.