आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण विभागात कर्मचारी लाचखोर पालिकेचे अधीक्षक खान यांनी तयार केला अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत अनेक कर्मचाऱ्यांचे ‘हात काळे’ असल्याचे बोलले जात होते. पीडित हॉकर्सनेही यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, यावर कारवाई होत नव्हती. तर या लाचखोर, चिरीमिरी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी कर्मचारीच बदनाम होत हाेते. हा सर्व प्रकार पाहून अतिक्रमण विभागाने नऊ लाचखोर कर्मचाऱ्यांच्या बदलीचा शनिवारी प्रस्ताव तयार केला. यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हा प्रस्ताव सोमवारी आयुक्तांसमोर ठेवला जाणार आहे. 
 
हॉकर्सला एका जागेवरून उठवून पर्यायी व्यवस्था पालिकेने करून दिली अाहे. मात्र, पूर्वीची जागा सोडण्यास अाजही हॉकर्स तयार नाहीत. अशात अतिक्रमण विभागाने दररोज कारवाई करण्याचा सपाटा सुरू ठेवला. तरीही कमी-अधिक प्रमाणात हॉकर्स जुन्या जागेवर बसत होते. कारवाई करताना अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांकडूनच दुजाभाव केला जात होता. जे हॉकर्स ‘चिरीमिरी’ देत त्यांना सूट, तर ज्यांनी चिरीमिरी दिली नाही त्यांच्यावर कारवाई, असे चित्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होते. 
 
लाचखोर कर्मचारी पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत ‘जाेरात कमाई’ करत होते. अखेर अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देत लाचखोर कर्मचाऱ्यांना शोधून काढले. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव अतिक्रमण अधीक्षक खान यांनी तयार केला. दरम्यान अतिक्रमण विभागात सध्या ४० कर्मचारी कार्यरत आहेत. 
 
हॉकर्सथेट खान यांच्या दालनात 
अतिक्रमणविभागातील लाचखाेर कर्मचारी लाच देणाऱ्या हॉकर्सला संरक्षण देत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार पाहून काही हॉकर्स थेट खान यांच्या दालनात जाऊन त्यांना भेटले. ‘इतर कर्मचारी पैसे देतात, आम्हीही द्यायला तयार आहोत, तुम्ही किती पैसे घेणार?’, ‘तुम्ही पैसे घेतात का?, कर्मचारी तुमच्या नावाने पैसे घेतात’ अशी माहिती खान यांना मिळाली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने कर्मचारीच लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
 
वृद्ध हॉकर्स महिलेचे डोके फोडले 
खान्देशमिल कॉलनी येथे राहणाऱ्या कौशल्या रमेश वाणी (वय ६५) या वृद्धा महात्मा गांधी मार्केटच्या ओट्यावर धान्य विक्रीचे दुकान लावतात. शनिवारी दुपारी त्यांच्यावर कारवाईसाठी अतिक्रमणचे कर्मचारी गेले होते. धान्य जप्त करत असताना कर्मचाऱ्यांना रोखण्याचा वाणी यांनी प्रयत्न केला. या वेळी कर्मचााऱ्यांनी दांडगाई करून आजींना ढकलून दिले. यात त्यांचे डोके फुटले आहे. शेजारच्या लोकांनी त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...