आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाखाली अवैध पार्किंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. गुरुद्वारा, पारोळारोड, चाळीसगावरोड चौफुली आणि नगावबारी परिसरासह इतर ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाखाली सर्रास चारचाकी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे या जागा अघोषित पार्किंग झोन झाल्या आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.

शहराजवळून मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर महामार्ग जातात. त्यापैकी मुंबई-आग्रा महामार्गाचे काही वर्षांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले आहे. या चौपदरीकरणांतर्गत पाच ते सहा ठिकाणी उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात गुरुद्वारासमोर, चाळीसगावरोड चौफुली, पारोळारोड चौफुली, वडखेडी रस्ता, बिलाडीफाटा आणि नगावबारी आदी ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुलांखालून शहरात येणार्‍या वाहनांसाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. एकाच वेळी चार वाहने जाऊ शकतील अशा पद्धतीचे हे रस्ते आहेत ; परंतु उड्डाणपुलाखालील जागा चारचाकी, मालवाहू ट्रकधारकांकडून पार्किंगसाठी वापरण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी लहान रस्ता शिल्लक राहतो. एकापाठोपाठ चार ते पाच मोठे ट्रक, टॅँकर, खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेस या ठिकाणी बिनधास्त उभ्या राहतात. त्यामुळे उड्डाणपुलाखालून समोरच्या बाजूने कोणते वाहन येत आहे हे तत्काळ लक्षात येत नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.