आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवेशद्वारावरच अतिक्रमणाचा अपशकुन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव शहरात येणार्‍यांचे प्रवेशद्वार म्हणून अजिंठा चौफुलीची ओळख बनली आहे. हा चौक खूप मोठा आहे. या ठिकाणी महामार्गाचे एकत्रिकरण होते, पण चौकाच्या चारही बाजूंना झालेले अतिक्रमण आणि बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणार्‍या वाहनांमुळे हा चौक अतिक्रमणधारकांनी पूर्णत: ‘गिळला’ आहे. परिणामी, या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी अन् वाढत्या अपघातांमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे.

भुसावळ-नागपूर आणि औरंगाबाद-पुणे अशा मोठ्या शहरांना जोडणारे महामार्ग अजिंठा चौफुलीवर एकत्र येतात. त्यामुळे या चौकाला खूप महत्त्व आहे. हॉटेल्स, बिअर बार, शोरूम, गॅरेज यासारखे मोठे व्यवसायही या चौकात आहेत. मात्र, वारंवार होणारी वाहतूक कोंडी हे या चौकाचे सर्वात मोठे दुखणे झाले आहे. महिनाभरातून किमान तीन-चार वेळा या चौकात वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडीही साधीसुधी नसते, तर किमान तास-दोन तास वाहनधारकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ‘मेगा ट्रॅफिक जाम’ हे या चौकाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. तसेच अतिक्रमणांसह नागरिकांची बेशिस्तीही या प्रकाराला कारणीभूत आहे. त्यामुळे ‘दिव्य मराठी’ने या चौकावर विशेष लक्ष केंद्रित करून चौकात होणार्‍या वाहतूक कोंडीबाबत विशेष अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत या चौकात होणार्‍या कोंडीची प्रमुख कारणे, त्यावरील उपाय आणि महापालिका व पोलिस प्रशासनाची भूमिका विचारात घेऊन चौकाची या त्रासातून सुटका करण्याचे उद्दिष्ट हे अभियान राबवण्यामागे असणार आहे.
अजिंठा चौफुली येथून औरंगाबादकडे जाणारा रस्ता : हा रस्तादेखील रुंद आहे. मात्र, डाव्या बाजूला औरंगाबाद, पहूर, शेंदुर्र्णीकडे जाणार्‍या कालीपिली व ट्रॅव्हल्स उभ्या असतात.तसेच एमआयडीसीकडे जाणार्‍या रिक्षाही मुख्य रस्त्यावरच उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार सुरू असते. उजव्या बाजूला आदित्य होंडा आणि सातपुडा आॅटोमोबाइल्सचे शोरूम आहे. त्यांनी आपापल्या शोरूमच्या गेटपासून ते महामार्गापर्यंतच्या जागेवर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. त्यामुळे ही जागा वाहनचालक वापरत नाहीत. त्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे ही जागा शोरूममध्ये येणार्‍या ग्राहकांच्या पार्किंगसाठीच वापरली जाते.
चौकाला आंदोलकांची पसंती
सर्वच राजकीय पक्ष या चौकात रास्ता रोको आंदोलन करत असतात. चौकात अतिक्रमणे जास्त असल्यामुळे चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी लवकर होते. परिणामी, आंदोलने यशस्वी होतात. आंदोलन संपल्यानंतर मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दोन ते तीन तास लागतात.
किरकोळ अपघात वाढले
अजिंठा चौफुलीवर किरकोळ अपघातांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही चौफुली जीवघेणी बनली आहे. सतत होणारी वाहतूक कोंडी व बेशिस्त वाहनांची पार्किंग या प्रमुख गोष्टी या अपघातांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.