आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण पथकातील महिलाही घेतात हप्ते; महासभेमध्ये आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यादोन महिन्यांपासून सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सचे अतिक्रमण काढण्यात आले आहे; परंतु अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी हप्तेखोरी सुरू केल्यामुळेच त्या ठिकाणी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे आता महिला कर्मचारीदेखील हप्ते घेतात, असा स्पष्ट आरोप नगरसेवक अनंत जोशी यांनी सोमवारी महासभेत केला. त्यामुळे हॉकर्स स्थलांतराबाबत धोरण ठरवण्याच्या विषयावरूच सभेत चांगलीच चर्चा झाली, तर यापुढे अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सचे साहित्य जप्त करून ते परत करण्याचा ठरावही करण्यात आला. तसेच शहरात मंगळवारीपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे अायुक्तांनी सांगितले.
उपमहापौर ललित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक जोशी यांनी हॉकर्स स्थलांतराच्या विषयावर अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. वर्षभरापासून ठराव करूनदेखील या विषयावर वारंवार बोलावे लागत आहे. ८-८ तास बसून लकी ड्रॉ काढून स्थलांतर केले. ज्यांना एका जागेवरून हटवले, ते पुन्हा तेथेच येऊनबसले आहेत. त्यामुळे यात राजकारण केले जात आहे. तसेच फुले मार्केटमध्ये १५-२० फुटांच्या पेट्या टाकून अतिक्रमण केले जात आहे. राजकीय लोकांनीसुद्धा तेथे जागा घेतल्या आहेत. अधिकारी दबावाखाली काम करतात; पोलिस मदतीशिवाय काम करता येत नाही, अशी उत्तरे मिळतात. निम्मे कर्मचारी फुकटचा पगार घेत आहेत, असेही जोशी म्हणाले. एकमताने केलेला ठराव वारंवार बदलू नका. कर्मचारी हप्ते घेत असतील तर त्यांच्या विभागप्रमुखांना जबाबदार धरले पाहिजे. पोलिस बंदोबस्त मिळत नसेल तर महापालिकेने स्वत:चे सुरक्षारक्षक तयार करावे. त्यांच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाला सुरक्षा पुरवावी, असे रमेश जैन यांनी सुचवले. जयश्री पाटील यांनी रामानंदनगर, तर भागचंद जैन यांनी पिंप्राळा, गुजराल पेट्रोल पंपाच्या परिसरातील अतिक्रमणाचा विषय मांडला. तसेच कैलास सोनवणेंनी शहराच्या मध्यवर्ती भागातील सट्टापेढ्यांनी केलेल्या अतिक्रमणाची माहिती दिली. त्यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंगळवारपासून पथके तयार करून अतिक्रमण काढले जाईल. त्याठिकाणी पुन्हा हॉकर्स बसले तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. १० पोलिस कायमस्वरूपी मदतीला घेऊ. भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...